देवरूख: कोसुंब-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात होऊन प्रतीक सावंत (वय ३३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर आंबवली व परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली. केवळ चालकावरच नव्हे, तर बेकायदेशीर चिरे वाहतुकीला जबाबदार असणाऱ्या मूळ ट्रक मालकावरही कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी देवरूख पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन छेडले. जोपर्यंत ट्रक मालकावर गुन्हा नोंदवला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली.
अपघाताची वार्ता समजताच आंबवली परिसरातील शेकडो ग्रामस्थ देवरूख पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले होते. सुरुवातीला प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा वळवला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मार्गावरील अनधिकृत चिरे वाहतूक रोखण्यात यावी आणि दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाची कसून तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. सदर ट्रकचे पीयूसी, योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस), विमा तसेच परवान्याची वैधता ही २०२४ मध्येच संपल्याचे निष्पन्न झाले. अशा पूर्णपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर वाहनाची रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पावसाळ्याच्या काळात चिरेखाणी बंद असण्याचे नियम असताना ही वाहतूक कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहे, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला.
अखेर ग्रामस्थांच्या तीव्र दबावानंतर पोलिसांनी ट्रक मालक वैशाली साठे यांच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मालकावर कायदेशीर कारवाई झाल्यानंतरच गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी प्रतीक सावंत यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करत आहेत.



