आरवलीत कृषी प्रदर्शन, रानभाजी महोत्सव उत्साहात

Gramin Varta
65 Views

आधुनिक शेती तंत्रज्ञानासह रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित; पाककला स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

आरवली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या वतीने आरवली येथे कृषी प्रदर्शन, रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कृषी प्रदर्शनात विविध पिके, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीसाठी उपयुक्त साधने, कृषी निविष्ठा तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीचे प्रात्यक्षिक व सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणे तसेच कृषी क्षेत्रातील नव्या संधींची ओळख करून देणे हा प्रदर्शनाचा उद्देश होता.

रानभाजी महोत्सवात स्थानिक पातळीवर उपलब्ध विविध रानभाज्यांचे महत्त्व, पौष्टिक गुणधर्म आणि आहारातील उपयोग याबाबत माहिती देण्यात आली. पाककला स्पर्धेत पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण आणि पौष्टिक पदार्थांचे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या (महाराष्ट्र जनुकीय बँक) प्रकल्प सहाय्यक अतिश माईंकर यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य महेश जड्यार, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कांगणे, सरपंच निलेश भुवड, ग्रामसेवक अभिजीत चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी तेजल मालवणकर, कोमल सुर्वे आणि सुवर्णा शिसाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आरवली केंद्राचे केंद्रप्रमुख सानप, आरवली नं. १ शाळेचे मुख्याध्यापक जायभाये तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा यांचीही उपस्थिती होती.

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुनीतकुमार पाटील, उद्यानविद्या विभागप्रमुख प्रा. एस. पी. जाधव आणि जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. ए. डी. जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. एस. एस. धेरे यांनी ‘कीड-रोग व्यवस्थापन व शेतीतील आधुनिकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

पाककला स्पर्धेचे परीक्षण प्रा. विक्रांत साळवी आणि प्रा. पांडुरंग पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन कृषी कन्या चेतना बांडागळे, श्रावणी सनगरे, निकिता कोकरे, मृण्मयी कोलते, पूनम काळे आणि आरती पांढरे यांनी केले.

कृषी प्रदर्शन, रानभाजी महोत्सव आणि पाककला स्पर्धेमुळे आधुनिक शेती तंत्रज्ञानासह स्थानिक रानभाज्यांचे महत्त्व आणि पौष्टिक आहाराबाबत जनजागृती झाली. विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Total Visitors :
4698234
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *