मंडणगड : घरातील जुन्या टीव्हीच्या मागे ठेवलेल्या कपाटाच्या चावीवर नजर ठेवून, त्याच चावीच्या साहाय्याने कपाटातील सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना मंडणगड तालुक्यातील सुर्ले-बौद्धवाडी येथे घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता बाळकृष्ण तांबे (वय ६५, रा. सुर्ले, बौद्धवाडी, ता. मंडणगड) यांच्या घरात ही चोरी झाली. दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ५ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी फिर्यादी कपाटाची चावी घरातील जुन्या टीव्हीच्या मागे ठेवताना पाहिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर संबंधित चावी घेऊन कपाट उघडण्यात आले आणि त्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचे, परस्पर संगनमताने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी नरेंद्र बाळाराम तांबे, महेंद्र बाळाराम तांबे, मालती नरेंद्र तांबे आणि मीना महेंद्र तांबे, सर्व रा. सुर्ले, बौद्धवाडी, ता. मंडणगड, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना मार्च महिन्यात घडली असली तरी या प्रकरणी २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.३५ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा तपास तसेच या प्रकरणातील पुढील कारवाई मंडणगड पोलीस करीत आहेत.
मंडणगडमध्ये घरातील कपाटातून सोन्याचे दागिने लंपास; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Leave a Comment





