पाचलमध्ये दहीहंडी उत्सवाचा अभूतपूर्व जल्लोष; आमदार किरण सामंत, युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांच्या भेटीने कार्यकर्त्यांत नवा उत्साह

Gramin Varta
576 Views

पाचल (तुषार पाचलकर) : राजापूर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पाचल येथे यंदाचा दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. अचूक नियोजन, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि तरुणाईच्या शिस्तप्रिय कामगिरीच्या जोरावर पाचलकरांनी यंदाचा दहिकाळा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला. दिवसभरात विविध भागांतून आलेल्या गोविंदा पथकांच्या सलामीने आणि जयघोषाने संपूर्ण पाचल परिसर दुमदुमून गेला होता.

पाचल बाजारपेठेत यावर्षी दोन भव्य दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने हॉटेल वैभव समोर ५१ हजार रुपयांची मानाची दहीहंडी आणि चुरशीची रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना पाचल व तळवडे विभाग, युवासेना आणि महिला आघाडीच्या संयुक्त विद्यमाने तब्बल १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची भव्य दहीहंडी उभारण्यात आली होती. या उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांसाठी खास मराठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आल्याने संगीताच्या तालावर गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.

या दोन्ही प्रमुख दहीहंडी उत्सवांना आमदार किरण सामंत आणि शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांनी प्रत्यक्ष सदिच्छा भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे स्थानिक कार्यकर्ते आणि गोविंदांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर, पाचलचे सरपंच बाबालाल फरास यांच्यासह पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाचे पदाधिकारी, शिवसेनेचे स्थानिक नेते, युवासेना आणि शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वपक्षीय आणि सर्वस्तरीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे यंदाच्या उत्सवाला एक वेगळीच भव्यता लाभली होती.

दरम्यान, पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या जाहीर रस्सीखेच स्पर्धेने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये ‘अव्हेंजर्स तळवडे’ संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘ए वन कृषी सेवा केंद्र’ संघाने द्वितीय आणि ‘पाचल गुरववाडी’ संघाने तृतीय क्रमांकावर समाधान मानले. विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्साहाच्या वातावरणात पण कोणत्याही गालबोटाशिवाय पार पडलेल्या या उत्सवाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4810902
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *