अहिल्यानगर : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जलालपूर येथील १९ वर्षीय विद्यार्थीनीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. अंकिता सुरेश सांगळे असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून, परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अंकिताला नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेत ३०० पेक्षा अधिक गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र तिला १६६ गुण मिळाले. अपेक्षित गुण न मिळाल्याने ती काही दिवसांपासून तणावात होती. याच परिस्थितीत तिने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर सांगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त अंकिताचे वडील सुरेश सांगळे आणि तिचा भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी घरात अंकिता आणि तिची आई होत्या. आई घरातील कामात व्यस्त असताना अंकिता अभ्यासासाठी असलेल्या स्वतंत्र खोलीत गेली. बराच वेळ तिची हालचाल जाणवली नाही म्हणून आईने पाहिले असता ही धक्कादायक घटना समोर आली.
घटनास्थळी अंकिताने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याची खंत आणि परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने आलेल्या नैराश्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आपल्या मृत्यूसाठी आई-वडील, भाऊ किंवा इतर कोणालाही जबाबदार धरू नये, असेही तिने लिहिल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी सांगळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेबाबत आगामी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
NEETमध्ये अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून एका तरुण विद्यार्थिनीने आपले आयुष्य गमावल्याच्या या घटनेने विद्यार्थी आणि पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. परीक्षेतील यश-अपयशापेक्षा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे आणि त्यांच्या भावनिक आधाराकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं; NEETमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने १९ वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या
Leave a Comment





