GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चैन लांबवली

रत्नागिरी:- शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून, गुरुवारी सकाळी हिंदू कॉलनी परिसरात एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हिंदू कॉलनी येथील रहिवासी कांचन जैन या गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास परिसरात असताना दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. यावेळी चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. जैन यांना काही समजण्यापूर्वीच दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळीवर झडप घातली आणि ती हिसकावून घेतली. चैन हातात लागताच चोरट्यांनी आपल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून वेगाने पलायन केले.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चोरीसाठी वापरलेली दुचाकी काळ्या रंगाची असून दोन्ही आरोपी सडपातळ बांध्याचे होते. यातील एकाने तोंडाला रुमाल बांधला होता, तर एक जण उंचीने जास्त होता. हे दोन्ही चोरटे तरुण असून ते एकमेकांशी मराठी भाषेत संवाद साधत होते, असे वर्णन समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या वर्णनाचे तरुण कुठेही संशयास्पदरीत्या दिसून आल्यास किंवा या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3440500
Share This Article