रत्नागिरी: रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तहसीलदार कार्यालय परिसरातील टू-व्हीलर पार्किंगमधून एक काळ्या रंगाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ज्योती प्रकाश कदम (वय ५७, रा. फ्लॅट नं. ३, चंद्रकला भवन, दत्तमंदिर समोर, तेलीअळी, ता. जि. रत्नागिरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी कदम यांनी त्यांची १५,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची यामाहा फॅसिनो गाडी (क्र. एम.एच. ०८ ए.एच. ३५९२) तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली होती. काम आटोपून आल्यानंतर त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय ही गाडी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
गाडी चोरीला गेल्याचे समजताच फिर्यादी यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार न करता आधी आजूबाजूच्या परिसरात आणि परिचितांकडे गाडीचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही दुचाकीचा कुठेही पत्ता न लागल्याने त्यांनी अखेर ३० मे २०२६ रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर १७३/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






