राजापूर : शहरातील व्यापारी, नागरिक आणि तालुक्यातून शहरात येणाऱ्या ग्रामस्थांना गेल्या काही दिवसांपासून त्रास देणाऱ्या एका मनोरुग्णाला अखेर उपचारासाठी रत्नागिरी मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा उपक्रम माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या पुढाकाराने आणि राजरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्याने, पोलिसांच्या मदतीने पार पडला.
मागील काही वर्षांपासून शहरात मनोरुग्णांची संख्या वाढत असून त्यांच्या अनपेक्षित हालचालींनी नागरिक हैराण झाले आहेत. यापूर्वी काही महिला मनोरुग्णांनी लोकांना त्रास दिला होता, तर एका मनोरुग्णाने हातातील काठीने मारहाण केली आणि शिवाजीपथ मार्गावरील गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या. त्यावेळीही ॲड. खलिफे यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी पाठवले होते.
यावेळी बाजारपेठेत फिरणाऱ्या एका मनोरुग्णाच्या किळसवाण्या वर्तनामुळे नागरिक आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. ग्रामस्थांनी नगरपरिषदेकडे तक्रार केली असता “हे आमचे काम नाही” असा प्रतिसाद मिळाला. अखेर ही बाब ॲड. खलिफे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यांनी तत्काळ राजरत्न प्रतिष्ठानशी संपर्क साधून राजापूर पोलिसांच्या सहकार्याने त्या मनोरुग्णाला रत्नागिरीला हलवले.
या कार्याबद्दल नागरिकांकडून ॲड. खलिफे यांचे कौतुक होत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, नगरपरिषद आरोग्य मुकादम राजन जाधव, संदेश जाधव, अजिम जैतापकर, परवेज मुंगी, सतिश बंडबे, राजरत्न प्रतिष्ठानचे पदाधिकारी छोटू खामकर, रुपेश सावंत, बॉण्ड सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष ॲड जमीर खलिफे यांच्या पुढाकाराने मनोरुग्णाची रत्नागिरीत रवानगी
