GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात मोफत कलमे-रोपे वाटप

Gramin Varta
206 Views

५ तालुके, ९ गावे, ६७६ शेतकरी, ३६४६ कलमे रोपे

दापोलीतील नवभारत छात्रालय परिवार आणि अश्विनी ऍग्रो फार्म यांचा संयुक्त उपक्रम

संगमेश्वर:- कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि सौ. सुषमा आणि प्रा. प्रभाकर शिंदे यांचा अश्विनी ऍग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड, गुहागर आणि लांजा या पाच तालुक्यातील ९ गावांमधील ६७६ शेतकऱ्यांना एकूण रु. १, ८९, २०० किंमतीच्या ३६४६ कलमा – रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही संस्था सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली अकरा वर्षे हा उपक्रम राबवित आहेत. यंदा या उपक्रमाचे हे बारावे वर्ष आहे.

मोफत कलमे रोपे वाटप उपक्रमाचा रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यामधून लाभ घेतलेल्या ६७६ शेतकऱ्यापैकी दापोलीतील रुखी व चिखलगाव या दोन गावांमधील १३६ , खेड मधील देवघर आणि घाणेकुंट या दोन गावातील २०० , मंडणगड मधील वेरळ, माहू आणि अडखळ या तीन गावातील १४० , गुहागर मधील खामशेत गावातील १०० आणि लांज्यामधील आसगे गावातून १०० शेतकरी समाविष्ट होते. या उपक्रमांतर्गत घाणेकुंट गाव सोडून इतर गावातील प्रत्येक शेतकऱ्याला चार कोकम रोपे, दोन काळीमिरी रोपे आणि दोन वर्षाचे एक चिकू कलम आणि एक लिंबू रोप मोफत पुरविण्यात आले. तर घाणेकुंट गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला लिंबू, फणस, काळा पेरू, आणि सोनचाफा यांचे प्रत्येकी एक रोप पुरविण्यात आले. मोफत पुरविण्यात आलेल्या ३६४६ कलमा रोपांमध्ये ११५२ कोकम रोपे, १०१२ काळीमिरी रोपे, ५७६ दोन वर्षाची चिकू कलमे, ५५६ लिंबू रोपे, १५० फणस रोपे, १०० काळा पेरू रोपे, १५० सोनचाफा रोपे यांचा समावेश होता. यापैकी एकूण रु. १, १३, ५०० किंमतीची ११५२ कोकम रोपे, १६६ चिकू कलमे, ५१६ लिंबू रोपे, १५० फणस रोपे, १०० काळा पेरू रोपे, १५० सोनचाफा रोपे  नवभारत छात्रालय परिवाराच्या कृषि केंद्रामधून पुरविण्यात आली, तर एकूण रु.७५, ७०० /- किंमतीची १०१२ काळीमिरी रोपे, ४१० चिकू कलमे आणि ४० लिंबू रोपे अश्विनी ऍग्रो फार्म मधून पुरविण्यात आली.

मोफत कलमे-रोपे वाटप करण्यासाठी सर्व गावांमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच फळझाडांच्या लागवडीविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले आणि लागवडीचे अर्थशास्त्रही पटवून दिले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन या दोन्ही संस्था शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कामाची दखल घेत यावर्षी लायन्स क्लब, दापोली यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला. लायन्स क्लब, दापोलीतर्फे चिखलगावातील ९६ शेतकऱ्यांना खते आणि वाळवी पावडरीचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २ किलो गोदरेज विकास आणि १०० ग्रॅम वाळवी पावडर पुरविण्यात आली. लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. आशिष मेहता आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, सदस्यही या प्रसंगी उपस्थित होते. संस्थेतर्फे आणि शेतकऱ्यांतर्फे लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांना विशेष धन्यवाद देण्यात आले.

यापूर्वी कलमे /रोपे वाटलेल्या काही गावांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन वाटप केलेल्या कलमे / रोपांचे जगण्याचे प्रमाण तपासले. याभेटीत कलमे / रोपांचे जगण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या चांगले असल्याचे दिसून आले. परंतु वाटप केलेल्या कलमा रोपांच्या लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे गरजेचे असल्याचे जाणवले. त्यानुसार यावर्षी वाटप कार्यक्रमाच्या वेळी लागवडीचे प्रत्यक्षिकही दाखविण्यात आले.

मोफत कलमे रोपे वाटप करण्यासाठी संस्था आणि गावातील पदाधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय राखण्यामध्ये आणि अंमलबजावणी मध्ये अनेक व्यक्तींनी परिश्रम घेतले. त्यामध्ये वेरळ (मंडणगड) गावचे सरपंच श्रीकृष्ण जोशी, कृषि महाविद्यालय, दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे आणि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमातील कृषि कन्या, कुणबी समाजोन्नत्ती संघाच्या मंडणगड शाखेचे अध्यक्ष दिनेश सापटे, कुणबी सेवा संघ, लांजाचे अध्यक्ष शांताराम गाडे, आसगे (लांजा ) गावच्या सरपंच सौ. अनुष्का गुरव, दापोली पंचायत समितीचे कृषि विस्तार अधिकारी दिनेश राणे, देवघर (खेड ) गावचे सरपंच सुनिल मोरे, खामशेत (गुहागर) गावचे सरपंच मंगेश सोलकर, कुणबी सेवा संघाचे सदस्य प्रभाकर तेरेकर, रुखी (दापोली) गावचे वाडी अध्यक्ष  बाबू मांडवकर आणि घाणेकुंट (खेड ) गावचे सरपंच  संतोष ठसाळे यांचा समावेश होता. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कलमे – रोपे पुरविणे, कलमे -रोपे वाटप आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे,  ही सर्व कामे अत्यंत नियोजन पूर्वक करण्याचे काम कुणबी सेवा संघांचे सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर यांनी केले, त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.

कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर, खजिनदार प्रदीप इप्ते, सदस्य प्रभाकर तेरेकर, श्री. चंद्रकांत मोहिते, दिनेश राणे,  सुरेश लोखंडे, सुनिल गुरव,  शिवप्रसाद चौगुले यांनी परिश्रमपूर्वक या समजोपयोगी कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. सर्वच गावातील पदाधिकारी, शेतकरी आणि महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले. विशेषतः कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे आणि अश्विनी ऍग्रो फार्मसच्या सौ. सुषमा शिंदे आणि राजकिरण शिंदे यांचे मनापासून आभार मानले. या सर्वांनी वाटप केलेल्या कलमा रोपांची योग्य प्रकारे लागवड करू, त्यांची निगालो राखू आणि संस्थेचे ऋण फेडू अशी ग्वाही दिली.कुणबी सेवा संघांचे कर्मचारी सुनील ठाकूर, सौ. वर्षा गोरीवले, सौ. रेणुका शिंदे, सौ. कीर्ती घाग, सुजित गोलांबडे, समीर शिबे, सौ. रिया पागडे, श्रीमती सुवर्णा अबगुल, सौ. मानसी मुलुख, सौ. श्रावणी झगडे, सौ. धनश्री मुलुख, आणि कु. दक्षता मिसाळ यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Total Visitor Counter

3086602
Share This Article