संगमेश्वर /दिनेश आंब्रे: नावडी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामसभेत गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उदय संसारे यांची निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच सौ. प्रज्ञा कोळवणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संसारे यांचे अभिनंदन करण्यात आले, तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता नावडी ग्रामपंचायत येथे सरपंच सौ. प्रज्ञा कोळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी उपसरपंच विवेक शेरे, माजी उपसरपंच संजय कदम, संगम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोळवणकर, ग्राम विकास अधिकारी संजय शेलार, ‘घे भरारी’ ग्राम संघ अध्यक्ष प्रिया सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा शेरे, ज्येष्ठ नागरिक भिकाजी साळवी, अविनाश चोचे, विनायक पाथरे, बाबासाहेब प्रभावळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी श्रीकृष्ण बेंडके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुर्वे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य तसेच पोलीस पाटील अंगराज कोळवणकर यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या महत्वपूर्ण सभेत नावडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उदय संसारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानंतर सरपंच प्रज्ञा कोळवणकर, उपसरपंच विवेक शेरे आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुर्वे यांच्या शुभहस्ते नूतन अध्यक्ष उदय संसारे यांचा सत्कार करण्यात आला. गाव पातळीवरील वाद-विवाद सामोपचाराने सोडवून गावाला तंटामुक्त ठेवण्याची मोठी जबाबदारी आता संसारे यांच्यावर असणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.