GRAMIN SEARCH BANNER

कोकणातील रो-रो सेवा तत्काळ रद्द करा; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे प्रवास रखडणार

Gramin Varta
7 Views

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील कोलाड ते गोव्यातील वेर्णादरम्यान रोल-ऑन रोल-ऑफ (रो-रो) कार-फेरी ही अभिनव सेवा कोकण रेल्वेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या सेवेमुळे गणेशोत्सव काळात कोकण जाणाऱ्या प्रवासी रेल्वे सेवांवर परिणाम होईल.

तसेच, रो-रो सेवेसाठी लागणारे रेल्वेचे मनुष्यबळ, सेवेसाठी लागणारा वेळ, मार्ग उपलब्ध न होणे या कारणामुळे, तसेच जादा भाड्यामुळे या सेवेला प्रतिसाद मिळणे कठीण आहे. त्यामुळे रो-रो सेवा तत्काळ रद्द करून, अधिकाधिक प्रवासी विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल.

रस्ते मार्गे कोलाड – वेर्णा प्रवासासाठी सध्या १० ते १२ तास लागतात. तर, रो-रो सेवेमुळे रेल्वेने १२ तास लागतात. मात्र, ३ तासांपूर्वी पोहोचणे आणि गाडी लोडिंगची आवश्यकता असल्याने, एकूण वेळ वाचत नाही. त्यासोबतच ७,८७५ रुपये प्रति वाहन आणि प्रवाशांचे स्वतंत्र भाडे हा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नाही.

एकत्र प्रवास होणार नाही

एका वाहनामागे फक्त तीन प्रवाशांची अट अव्यवहार्य आहे. गणपतीसारख्या सणामध्ये कुटुंबात ५ ते ७ सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची व्यवस्था करावी लागेल.

रो-रो सेवा चालवण्यासाठी लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट, ट्रेन व्यवस्थापक यांचा स्वतंत्र ताफा लागतो. हेच मनुष्यबळ आणि मार्ग वापरून एखादी पूर्ण प्रवासी गाडी चालवता आली असती, तर ती अधिक उपयोगी ठरली असती.

गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्ग अत्यंत व्यस्त असतो. अशावेळी मालवाहतुकीसाठी वेगळी गाडी चालवणे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम करू शकते.

रो-रो सेवेसाठी कोलाड – वेर्णा हा मार्ग थेट आहे. मार्गामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील स्थानकांवर गाड्या लोड किंवा अनलोड करता येणार नाहीत. ज्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रवाशांना याचा लाभच होणार नाही.

हेही वाचाकोपर, ठाकुर्ली धीम्या रेल्वे स्थानकातील लोकल थांबा रद्द; प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकावरून करावा लागणार प्रवास

कोलाड-वेर्णा रो-रो सेवा रद्द करावी

गणेशोत्सव काळात कोलाड – वेर्णा रो-रो सेवा चालवण्याऐवजी अधिकच्या प्रवासी विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली.

Total Visitor Counter

2652199
Share This Article