GRAMIN SEARCH BANNER

भाट्ये येथे दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

Gramin Varta
555 Views

रत्नागिरी :- शहरालगतच्या भाट्ये परिसरात दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या इलेक्ट्रीक दुचाकी चालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी दुसऱ्या दुचाकी चालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अपघात शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फणसोप–रत्नागिरी मार्गावर भाट्ये येथील नजीर उस्मान वाडकर यांच्या घरासमोर घडला. अख्तर यासिन साखरकर (वय ३८, रा. नवनगर, भाट्ये, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. अख्तर साखरकर आपल्या दुचाकीवर (एमएच-०८ एयू-९४७५) पत्नी वफा आणि मुलगा मोहम्मद यांच्यासह फणसोपकडून रत्नागिरीकडे जात होते.

भाट्येतील घटनास्थळी पोहोचताच, वेगावर नियंत्रण न ठेवता साखरकर यांनी समोरून येणाऱ्या प्रशिल सुनील साळवी यांच्या इलेक्ट्रीक दुचाकीला (एमएच-०८ बीएफ-३२८५) डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत प्रशिल साळवी रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील पत्नी व मुलगा यांनाही किरकोळ दुखापत झाली असून, दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे यांनी तक्रार दिली असून, तक्रारीनुसार अख्तर यासिन साखरकर याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3072146
Share This Article