मंडणगड : तालुक्यातील सावरी फाटा येथे अज्ञात व्यक्तीने २ लाख १६ हजार रुपयांची ऑप्टिकल फायबर केबल कापून मोठे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणकोट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील तुषार अनंतराव देसले (वय ४२ वर्षे) यांनी बाणकोट पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. देसले यांच्या मालकीची, ‘एबरडेअर’ (ABERDARE) कंपनीची ३,३३१ मीटर लांबीची, काळ्या रंगाची ऑप्टिकल फायबर केबल (OFC) सावरी फाटा येथे ठेवण्यात आली होती. ही घटना १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजल्यापासून ते ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने ही केबल ठिकठिकाणी कापून तिचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीची एकूण किंमत २,१६,८८१ रुपये इतकी आहे.
या गंभीर प्रकाराची तक्रार १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८:१० वाजता बाणकोट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३२४(५) नुसार गुन्हा दाखल केला असून, गुर.आर.क्र. १४/२०२५ असे नोंदवण्यात आले आहे.
मंडणगड : लाखो रुपयांच्या ऑप्टिकल फायबर केबलची तोडफोड; अज्ञातावर गुन्हा
