दापोली – दापोली कस्टम विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केले आहे. १२ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दापोली कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक (पी अँड आय) अतुल व्ही. पोतदार आणि अधीक्षक (हरनाई) विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोवा किल्ल्याजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर शोध मोहीम राबवली. या मोहिमेत “पांढऱ्या-हलका तपकिरी रंगाचा, अत्यंत चिकट जेलीचा गोळा” आढळून आला. तपासणीअंती तो दुर्मिळ ‘अंबरग्रीस’ असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या या पदार्थाचे वजन ४ किलो १४० ग्रॅम असून, त्याची राखाडी बाजारातील किंमत सुमारे ५.४५ कोटी रुपये इतकी आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सीमाशुल्क विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, अशा प्रकारचा कोणताही पदार्थ आढळल्यास तात्काळ विभागाला ८७९६८९५९९० या क्रमांकावर संपर्क साधावा.
बेकायदेशीरपणे हा पदार्थ जवळ बाळगणे किंवा त्याचा व्यापार करणे सीमाशुल्क कायदा, १९६२ आणि वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत गंभीर गुन्हा असून, कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही विभागाने दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाला मोठी मागणी असल्यामुळे अशा प्रकारच्या तस्करीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्यांचा शोध घेतला जात आहे.