लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा रेस्ट हाऊस नजीक बुधवारी रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर लांजा शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लांजा शहरात मोकाट गुरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील साटवली फाटा, हायस्कूल, बाजारपेठ, पोलीस वसाहत तसेच रेस्ट हाऊस परिसरात ही गुरे मोठ्या संख्येने फिरताना आढळतात. ही गुरे स्थानिक शेतकऱ्यांची असली तरी त्यांच्या देखरेखीअभावी ती मोकाट फिरत असून थेट महामार्गावर येऊन बसतात. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात ही गुरे दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता असते.
लांजा नगरपंचायतीने यापूर्वी मोकाट गुरे पकडण्यासाठी मोहीम राबवली होती. मात्र ती मोहीम काहीच दिवसांत थंडावली आणि नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा गुरांचा उपद्रव वाढला आहे. महामार्गावर गुरे बसल्याने वाहतूकीस सतत अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे अडथळा निर्माण होऊन दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार घडतात.
दरम्यान, बुधवारी रात्री घडलेली दुर्घटना ही याच समस्येचे गंभीर उदाहरण असून अशा प्रकारचे अपघात घडू नये म्हणून नगरपंचायतीने तातडीने या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी लांजातील नागरिकांमधून होत आहे.
लांजा रेस्ट हाऊसजवळ रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत गायीचा मृत्यू
