GRAMIN SEARCH BANNER

‘स्वास्थ्य नारी सशक्त परिवार’ अभियानाला संगमेश्वरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी ७०५ नागरिकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

Gramin Varta
225 Views

संगमेश्वर: ‘स्वास्थ्य नारी सशक्त परिवार’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात (सिव्हिल) महिलांच्या आरोग्य तपासणी व उपचारांवर विशेष लक्ष केंद्रित करणारे शिबिर शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अभियानाचा उद्देश महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा आणि सामाजिक आधार यावर भर देणे हा आहे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आयोजित या महाशिबिराचा ७०५ लोकांनी सक्रिय सहभाग घेत लाभ घेतला, ज्यात प्रौढ स्त्री-पुरुष आणि किशोरवयीन मुलींचा समावेश होता.

शिबिरात सहभागी नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग तपासणी यासह स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय, गरोदर महिलांसाठी प्रसूतिपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग (T.B.), सिकलसेल आजार व रक्तक्षय (ॲनिमिया) तपासणी यांसारख्या सेवा उपलब्ध होत्या. तज्ज्ञांनी आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केले, तसेच स्थानिक आहाराचे पोषणमूल्य समजावून सांगितले. महिलांच्या विविध आजारांवरील उपाययोजना आणि योगाभ्यास यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
यासोबतच, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान वय वंदना कार्ड, सिकलसेल कार्ड यांसारख्या शासनाच्या योजनांची माहिती व नोंदणी करण्यात आली. पोषण टँकरमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी, रक्तदान शिबिर आणि निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणीचा उपक्रमही यावेळी राबवण्यात आला.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कसबा सरपंच सौ. पूजा लाणे आणि संगमेश्वर लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. रविकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. शिबिराला आमदार मा. श्री. शेखरजी निकम यांनी विशेष भेट दिली व वैद्यकीय अधिकारी डॉ. सानप यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, सौ. पूजा शेखर निकम यांनी देखील भेट देऊन महिलांना प्रोत्साहन दिले.
हा आरोग्य महाकॅम्प यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापारी, डॉ. प्रदीप खातो, श्री. पंकज संसारे (सोळजाई लॅब), श्री. अवधूत जोशी (डायमंड डिस्ट्रिक), वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, मेडिकल स्टोअर्स, संगमेश्वर तालुका मेडिकल असोसिएशन, श्री. प्रशांत यादव (वाशिष्टी दुग्ध संघ चिपळूण), तालुका प्रमुख भाजप श्री. कोळेकर आणि मंडप डेकोरेशन यांनी आर्थिक मदत आणि बहुमूल्य सहकार्य केले. या अभियानातून संगमेश्वर तालुक्यात महिलांच्या आरोग्याबाबत मोठी जनजागृती करण्यात आली.

Total Visitor Counter

3199477
Share This Article