GRAMIN SEARCH BANNER

भोस्ते घाटात भीषण अपघात; संरक्षक भिंतीला धडकून कंटेनर हवेत लटकला, दोघे  गंभीर

Gramin Varta
171 Views

खेड:  मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा समजल्या जाणाऱ्या भोस्ते घाटात मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. मुंबईच्या दिशेने शीतपेयांचे बॉक्स घेऊन जाणारा एक वेगवान कंटेनर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट घाटातील संरक्षक भिंतीवर जाऊन आदळला. ही धडक इतकी भीषण होती की, संरक्षक भिंत फोडून ट्रकचा पुढचा भाग थेट दरीत कोसळण्याच्या स्थितीत हवेत लटकला. या अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला असून त्यामध्ये प्रवास करणारे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. ट्रक हवेत लटकलेल्या अवस्थेत असल्याने अडकलेल्या जखमींना बाहेर काढणे मोठे आव्हानात्मक होते, मात्र उपस्थितांनी जिवाची बाजी लावत दोघांनाही बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका आणि मदत ग्रुपचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त ट्रकमध्ये थम्सअप कंपनीच्या शीतपेयांचा साठा असल्याचे समोर आले आहे. घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत असून, उशिरापर्यंत महामार्गावर अपघातग्रस्त वाहन हटवण्याचे काम सुरू होते.

Total Visitor Counter

3391780
Share This Article