GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर :  फुणगुस येथे घरगुती वादातून पती-पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

Gramin Varta
96 Views

संगमेश्वर: तालुक्यातील फुणगुस गुरववाडी येथे सामाईक घराच्या वादातून दोन नातेवाईकांनी एका दाम्पत्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. साक्षी सचिन गुरव (वय ३६, रा. फुणगुस गुरववाडी, ता. संगमेश्वर) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी साक्षी गुरव आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असून एकाच सामाईक घरात वेगवेगळे राहतात. गुरुवार, १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास साक्षी गुरव आणि त्यांचे पती सचिन जयराम गुरव हे दोघे घरात हजर होते. त्यावेळी घराच्या बांधकामाबाबत त्यांच्या शेजारी काम करणाऱ्या कामगारांसोबत त्यांची चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच तिथे आलेल्या आरोपी अक्षय अशोक गुरव याने मागून येत फिर्यादी साक्षी यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला.

या अनपेक्षित हल्ल्यामुळे साक्षी गुरव या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. पत्नीला वाचवण्यासाठी त्यांचे पती सचिन गुरव तात्काळ पुढे सरसावले असता, आरोपी अक्षय याने त्यांनाही सोडले नाही. त्याने सचिन यांच्या डाव्या खांद्यावर आणि उजव्या पायावर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याच वेळी तिथे उपस्थित असलेली दुसरी आरोपी निशा अशोक गुरव हिने फिर्यादी व त्यांच्या पतीला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत ‘तुम्हाला मारून टाकू’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर जखमी दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी साक्षी गुरव यांच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी शुक्रवार, १५ मे रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी अक्षय गुरव आणि निशा गुरव यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3390008
Share This Article