GRAMIN SEARCH BANNER

सावंतवाडीतील ब्रिटीशकालीन कारागृहात ‘जेल पर्यटन’!

Gramin Search
6 Views

सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जिल्हा कारागृहे आहेत. पैकी एक ब्रिटिशकालीन सर्वात जुने जिल्हा कारागृह सावंतवाडी येथे असून दुसरे सिंधुदुर्गनगरी येथे अलीकडेच उभारण्यात आले आहे.

जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या पाहता सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे, त्यामुळे सावंतवाडीतील ब्रिटीशकालीन कारागृह पर्यटनासाठी वापरून त्याठिकाणी ‘जेल पर्यटन’ ही अभिनव संकल्पना राबवता येऊ शकते, त्याने जिल्ह्याच्या पर्यटनला एक नवी दिशा मिळेल, असे मत रविवारी आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. केसरकर यांनी ‘जेल पर्यटन’ या संकल्पनेवर विशेष भर दिला. कोणत्याही जिल्ह्यात दोन कारागृह नाहीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी दर पाहता, सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे. सावंतवाडी येथील कारागृह सुमारे 150 वर्षांपूर्वीचे असून ते आता रिकामे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी या कारगृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने येथील सर्व कैद्यांना सिंधुदुर्गनगरीतील कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यामुळे, या ऐतिहासिक कारागृहाचा उपयोग ‘जेल पर्यटन’ साठी करता येईल.

यामुळे पर्यटकांना एक वेगळा आणि अनोखा अनुभव मिळेल. तसेच सिंधुदुर्ग हे पहिले ‘जेल पर्यटन’ केंद्र म्हणून ओळखले जाईल, सावंतवाडीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असल्याने, असे अभिनव पर्यटन उपक्रम सुरू झाल्यास त्याचा जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल, असे आ. केसरकर म्हणाले.

पालकमंत्री नीतेश राणे यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि एकत्र काम करण्याच्या वृत्तीमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंत्री नीतेश राणे यांनी, आ. केसरकर यांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असे विधान केले होते. त्याचे आ. केसरकर यांनी कौतुक केले. देवगड येथे उभारण्यात येत असलेल्या अ‍ॅक्वेरियममुळेही पर्यटन विकासाला गती मिळेल, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे विश्वासपात्र नाहीत!

राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे हे फतव्यांच्या मतांवर अवलंबून असून, त्यांना राज ठाकरे हिंदुत्व शिकवतील. राज ठाकरे यांच्यावर पुन्हा अन्याय होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करत, ‘यूज अ‍ॅण्ड थ्रो’ ही उद्धव ठाकरे यांची नीती असून, मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे, असा आरोप आमदार दीपक केसरकर यांनी केला. महाराष्ट्रात मारामार्‍या आणि भांडणे नको, अशी अपेक्षा व्यक्त करत, मराठी बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Total Visitor Counter

2652441
Share This Article