GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: मुसळधार पावसात गणपती घेऊन अडकले तरुण, मध्यरात्री पोलिसांनी सोडले सुखरूप घरी

Gramin Varta
24 Views

चिपळूण, (प्रतिनिधी): सर्वसामान्य नागरिकांची सेवा हेच ब्रीदवाक्य जपत पोलीस दल नेहमीच तत्पर असते. याच पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने गणपती उत्सवाच्या तोंडावर केलेल्या माणुसकीच्या कृतीमुळे दोन गणेश मूर्ती सुखरूप भक्तांच्या घरी पोहोचल्या आणि पोलिसाच्या कार्याला एक वेगळे समाधान मिळाले. अमावस्येची रात्र असल्याने पोलीस बंदोबस्त आणि गस्त वाढलेली असतानाही, एका कर्तव्यदक्ष पोलिसाने मदतीचा हात पुढे करत बुद्ध तत्त्वज्ञानाचा प्रत्यय आणून दिला.

दिनांक २४ जुलै २०२५ रोजी रात्री नेहमीप्रमाणे चिपळूण पोलीस दलातील आशिष बल्लाळ हे कामथे कापसाळ तसेच कामथे रेल्वे स्थानकात ड्युटीवर होते. अमावस्येच्या रात्री चोऱ्यांची शक्यता जास्त असल्याने पोलीस गस्त वाढवणे आवश्यक असते.

कोकणातील अनेक तरुण गणपती उत्सवासाठी पेणमधून रेल्वेने गणेश मूर्ती आणतात. काल रात्री दिवा-रत्नागिरी पॅसेंजरने कामथे येथील काही तरुणांनी गणेश मूर्ती आणल्या होत्या. त्यापैकी काही मूर्ती ते दुचाकीने घरी घेऊन गेले होते.
रात्री ११:३० नंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोन गणेश मूर्ती कामथे रेल्वे स्टेशनवरच अडकून पडल्या. पोलीस कर्मचारी आशिष बल्लाळ आणि त्यांचे सहकारी रेल्वे स्टेशनवर गप्पा मारत बसले होते. त्यांना पहाटे ४ वाजता रेल्वे स्टेशन आणि नंतर चिपळूण शहरात गस्त घालायची होती. रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्या तरुणांना विचारले असता, ते पाऊस थांबण्याची वाट पाहत असल्याचे समजले. पाऊस थांबायला तयार नव्हता आणि तरुण चिंतेत बसले होते.

यावेळी आशिष बल्लाळ यांनी सहजपणे, “मी सोडू का रे तुम्हाला घरी? त्यानिमित्ताने गणपतीची सेवाही माझ्या हातून घडेल,” असे विचारले. पोलीस गणवेशात असल्याने सुरुवातीला मुलांना थोडे अवघडल्यासारखे वाटले, पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ती मुले लगेचच तयार झाली. दोन गणेश मूर्तींना लहान बाळाप्रमाणे मांडीवर घेऊन ती मुले त्यांच्या गाडीत बसली. रात्री साधारण १:३० वाजण्याच्या सुमारास त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना कामथे येथील त्यांच्या वाडीत सुखरूप पोहोचवले.

आपल्या साचेबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन केलेली ही मदत आशिष बल्लाळ यांना एक वेगळे समाधान देऊन गेली. गणपती बाप्पा गाडीत बसल्यावर, पोलिसाच्या कारमधील डॅशबोर्डवरील भगवान गौतम बुद्धांची मूर्तीही आनंदावली असेल, कारण बुद्धाचे तत्त्वज्ञान सांगते की, “तुमचे काम हाच तुमचा धर्म आहे, ते प्रामाणिकपणे करा. जीवनाचा खरा आनंद आपण इतरांना समजून घेण्यात आहे.” या घटनेतून पोलिसांनी केवळ कर्तव्यच नाही, तर माणुसकीचे दर्शन घडवत एक आदर्श घालून दिला आहे.

Total Visitor Counter

2650585
Share This Article