GRAMIN SEARCH BANNER

दिल्लीतील मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यपदी राजापुरातील सुपुत्राची नियुक्ती

तुषार पाचलकर / राजापूर

राजापूर तालुक्यातील केळवली गावचा अभिमान असलेले, कै. केशव विठोबा हरयाण गुरुजी यांचे सुपुत्र डॉ. जगन्नाथ केशव हरयाण यांची दिल्लीजवळील प्रकाश आयुर्वेद मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे प्राचार्य (Principal) म्हणून नियुक्ती झाली आहे.

डॉ. जगन्नाथ हरयाण (एम.डी. आयुर्वेद, पीएचडी स्कॉलर) हे आयुर्वेद क्षेत्रातील अनुभवी शिक्षक व कुशल प्रशासक आहेत. शैक्षणिक निष्ठा, नेतृत्वगुण आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याची त्यांची क्षमता पाहून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

त्यांची पत्नी, डॉ. तेजस्विनी जगन्नाथ हरयाण (एम.एस. आयुर्वेद, पीएचडी स्कॉलर) या याच संस्थेच्या शल्यतंत्र विभागात सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. हरयाण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केळवली येथे झाले, तर बारावीपर्यंतचे शिक्षण खारेपाटण येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण झाले. सर्व भारत स्तरावरील प्रवेश परीक्षेत 13 वा क्रमांक मिळवून त्यांनी तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यावेतनासह एम.डी. शिक्षण पूर्ण केले. तसेच, ऑल इंडिया नेट परीक्षेत पात्र ठरून सध्या पीएचडी शिक्षण घेत आहेत.

ते खारेपाटण हायस्कूलमधील शिक्षक श्री. लक्ष्मीकांत हरयाण यांचे कनिष्ठ बंधू असून, आपल्या यशाचे श्रेय त्यांनी नम्रतेने आई-वडील, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांच्या प्रेरणा व सहकार्याला दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावकरी, शिक्षकवर्ग, सहकारी व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

2475126
Share This Article