निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप करणार पत्रव्यवहार
संगमेश्वर : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर आणि पोरबंदर या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना कोकण रेल्वे आणि भारतीय रेल्वे बोर्डाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, आता या मागणीसाठी थेट देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदयांना साकडे घालण्याचा निर्णय निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपने घेतला आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणाविरोधात आता सर्वोच्च स्तरावर दाद मागण्यात येणार आहे.
गेल्या अडीच वर्षांत स्थानिक आमदार, खासदार, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. केवळ कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाने एकमेकांवर जबाबदारी ढकलून वेळ मारून नेल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. या प्रश्नावर आंदोलन, उपोषण यांसारखे अनेक मार्ग अवलंबूनही लक्ष वेधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. रेल्वे प्रवाशांच्या भावनांशी चालवलेला हा ‘खेळ’ असल्याची तीव्र नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
या मागणीच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात संगमेश्वर भूमीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्षेत्रात पांडवकालीन शिल्पे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. श्री क्षेत्र मार्लेश्वर, टिकलेश्वर, कर्णेश्वर आणि सप्तेश्वर यांसारखी देवालयेही येथे आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारने घोषित केलेले छत्रपती संभाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक याच परिसरात उभारले जाणार आहे. पर्यटकांची वाढती पसंती असूनही या परिसरातील रेल्वे प्रवास मात्र अत्यंत यातनामय असल्याचे वास्तव या निवेदनात मांडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत या स्थानकातून दिवसाला १८७७ प्रवासी रोज प्रवास करतात आणि यातून रेल्वेला वर्षाला तब्बल ६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील व्यवस्थापकीय संचालकांसोबत या मागण्यांसंदर्भात दोन बैठका झाल्या आहेत, तसेच रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्यासोबतही या विषयावर चर्चा झाली आहे. मतदार संघाचे खासदार श्री. नारायण राणे यांनीही भेट घेऊन चर्चा केली, तर पद्मश्री दादा इदाते यांनीसुद्धा या मागण्यांचा पाठपुरावा केला. इतक्या उच्च स्तरावर पाठपुरावा होऊनही येथील प्रवाशांच्या मागण्यांचा विचार होत नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे मत निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळेच आता या प्रश्नावर न्याय मिळवण्यासाठी थेट देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.