भजनातील त्रिवेणी संगम आणि दुग्ध–शर्करा योगाचा रसिकांना अनोखा अनुभव
मनोहर धुरी / राजापूर :
तालुक्यातील वरची वाकी येथील युवा नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने देवीच्या उत्सवानिमित्त २८ सप्टेंबर २०२५ रोजी भजनाचा अद्वितीय 20-20 तिरंगी सामना रंगणार आहे. भजन रसिकांसाठी हा संगीत-सोहळा पर्वणी ठरणार आहे.
या रंगतदार सामन्यात भजन क्षेत्रातील तीन नामांकित बुवा आमनेसामने येणार आहेत –
◼️विनोद आणि मनोरंजनासाठी ख्यातनाम बुवा श्री. संदीप पुजारे (देवगड)
◼️अध्यात्माचे बादशहा बुवा श्री. गुंडू सावंत (कुडाळ)
◼️बतावणी व पहाडी आवाजाचे सम्राट बुवा श्री. प्रकाश पारकर (कासारडे)
ही तिहेरी जुगलबंदी रसिकांसाठी खऱ्या अर्थाने भजनाचा त्रिवेणी संगम ठरेल. तिन्ही बुवांनी राज्यभर शेकडो द्वंद्व सामन्यांत रसिकांना मंत्रमुग्ध केले असून भजन परंपरेचे जतन करण्यासाठी त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
यावेळी पखवाज-तबल्याच्या ठेक्यांवर, पेटीच्या सुरांवर आणि विनोदी शेरास–सव्वाशेर बतावणीवर रसिकांची विशेष मेजवानी होणार आहे. नामस्मरणाचा गोडवा आणि भक्तिरसाची उंची एकत्र आणणारा हा दुग्ध–शर्करा योग भजनप्रेमींना अनुभवता येणार आहे.
युवा नवरात्रोत्सव मंडळ, वरची वाकी यांच्या वतीने परिसरातील सर्व भजन रसिकांनी या अनोख्या 20-20 तिरंगी सामन्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राजापूर वरची वाकी येथे २८ सप्टेंबरला भजनाचा 20-20 तिरंगी सामना
