GRAMIN SEARCH BANNER

अंबरग्रीसवर संशोधन आणि लोकधोरण आवश्यक: डॉ. केतन चौधरी

Gramin Varta
58 Views

रत्नागिरी: स्पर्म व्हेलची उलटी म्हणजेच ‘अंबरग्रीस’ हा भारतात ‘संरक्षित’ वन्यजीव प्रकारात मोडत असल्याने या विषयावर संशोधन करणे आणि लोकोपयोगी धोरण ठरवणे गरजेचे आहे, असे मत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे प्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी व्यक्त केले आहे. मत्स्य व्यावसायिक आणि संबंधित लोकांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी रत्नागिरी येथे ‘अंबरग्रीस जनजागृतीसाठी विचार मंथन’ या एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबर २०२५ रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोकण किनारपट्टीवर अंबरग्रीस आढळण्याच्या घटना वाढल्यामुळे या विषयावर चर्चा व्हावी, अशी इच्छा केंद्राला भेट देणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने, आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी यांच्या आर्थिक सहकार्याने या विचारमंथन सभेचे आयोजन झाले. यात सुमारे ४० शास्त्रज्ञ, मत्स्य व्यावसायिक, वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, युएनडीपी प्रकल्पाचे अधिकारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

‘संरक्षित’ असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर भिन्न धोरण
डॉ. केतन चौधरी यांनी सांगितले की, स्पर्म व्हेल संरक्षित असल्याने त्याची उलटी (अंबरग्रीस) देखील भारतात ‘संरक्षित’ मानली जाते. व्यावसायिक बाजारपेठेत याला मोठी किंमत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत अंबरग्रीस संरक्षित आहे, परंतु इंग्लंड, न्यूझीलंड, फ्रान्ससारख्या देशांत व्हेल संरक्षित असला तरी अंबरग्रीस ‘संरक्षित’ नाही. या पार्श्वभूमीवर कोकण किनाऱ्यावर आढळणाऱ्या अंबरग्रीसबाबत संशोधन व्हावे, संशोधनाचे मुद्दे कोणते असावेत, तसेच लोकोपयोगी धोरण कसे असावे यावर विचारमंथन करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन, राज्यगीत, कृषी विद्यापीठ गीत आणि वंदे मातरम गायनाने झाले. उद्घाटनप्रसंगी अभिरक्षक डॉ. हरीश धमगये यांनी प्रास्ताविक केले, तर प्राध्यापक डॉ. आसिफ पागरकर यांनी केंद्राच्या कार्याची माहिती दिली. मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी या कार्यक्रमामधून जनजागृती होईल, अशी आशा व्यक्त केली.
रेंज फॉरेस्ट ऑफिसर किरण ठाकूर यांनी उपस्थितांना आवाहन केले की, अंबरग्रीस सापडल्यास घाबरू नका. तात्काळ १९२६ या हेल्पलाइन नंबरवर किंवा ‘जलचर’ या मोबाइल ॲपवर कळवावे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी अंबरग्रीसबाबत कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे मत मांडले. कायद्याची भीती न ठेवता, तो उत्तमरित्या लागू होण्यासाठी ज्याला अंबरग्रीस मिळेल, त्याला शासनाकडून बक्षीस स्वरूपात काहीतरी मोबदला मिळाल्यास कायद्याची उत्तम अंमलबजावणी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


तांत्रिक सत्रात सी.एम.एफ.आर.आय., मुंबई विभागाचे डॉ. अजय नाखवा यांनी ‘भारतातील सागरी सस्तन प्राण्यांच्या साठ्याचे मुल्यांकन’ यावर ऑनलाइन मार्गदर्शन केले. प्राध्यापक नरेंद्र चोगले यांनी अंबरग्रीसची माहिती आणि नवीन प्रस्तावित संशोधनाबद्दल माहिती दिली. किरण ठाकूर यांनी ‘वाईल्डलाईफ प्रोटेक्षण ॲक्ट, १९७२ मधील अंबर ग्रीस संबंधी नोंदी आणि कायदेविषयक स्थिती’ यावर मार्गदर्शन केले. पत्रकार महेंद्र पराडकर यांनी अंबरग्रीसबाबतचे स्वानुभव आणि पत्रकारांची भूमिका मांडली. प्राध्यापक सचिन साटम यांनी ‘अंबर ग्रीस: संशोधन आढावा’ सादर केला. यानंतर ‘अंबर ग्रीस: पर्यावरण पूरक लोकोपयोगी शासन भूमिका’ यावर खुली चर्चा झाली, ज्यात सर्व सहभागींनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे आणि केंद्राच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागारकर, डॉ. हरीश धमगये, प्राध्यापक नरेंद्र चोगले, प्राध्यापक सचिन साटम, व्ही. आर. सदावर्ते आणि ए. एन. सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

Total Visitor Counter

3073036
Share This Article