चिपळूण: शासनाने यावर्षीपासून अकरावीचे ॲडमिशन ऑनलाइन केले असून विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक केले आहे. विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलियर हे सर्टिफिकेट ग्रामीण भागामध्ये सहजासहजी मिळत नसल्यामुळे ओबीसी, एन.टी. एस.बी.सी. आणि एस.ई.बी.सी या विद्यार्थ्यांना अकरावीच्या पहिल्या राऊंडच्या ॲडमिशनमधून बाहेर पडावे लागत आहे.
फक्त काही विद्यार्थ्यांनाच संबंधित सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो. मात्र, अनेक ठिकाणी एका तलाठीकडे दोन ते तीन गावांचा कार्यभार असतो. या अतिभारामुळे संबंधित गावांतील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वेळेत उत्पन्नाचा दाखला मिळू शकत नाही. याशिवाय, उत्पन्न दाखला मिळण्याच्या प्रक्रियेस साधारणत: १५ दिवसांचा कालावधी लागतो. दाखले वेळेत उपलब्ध न झाल्यास अनेक पात्र विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या नॉनक्रिमिलियर सर्टिफिकेटच्या अटीमधून सवलत मिळावी. अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली.
अकरावीच्या ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया पहिल्यांदाच असल्यामुळे व या प्रकारच्या सर्टिफिकेटची कल्पना विद्यार्थ्यांना नसल्याकारणाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ही सर्टिफिकेट उपलब्ध नाहीत त्यामुळे या सर्टिफिकेटची अट काढावी. अशी ठोस भूमिका आमदार शेखर निकम यांनी घेतली.