डोंबिवली: अहमदाबाद येथील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या डोंबिवलीच्या २७ वर्षीय क्रू मेंबर रोशनी राजेंद्र सोनघरे हिच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळच्या सुमारास पूर्वेकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला.
नातेवाईक, मित्रमंडळी आणि शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.
मागील आठवड्यात अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग विमानात हवाई सेविका म्हणून रोशनी कार्यरत होत्या. उड्डाणाच्या तयारीदरम्यान विमानाच्या अघटित अपघातात रोशनी यांचा मृत्यू झाला. विमानात भीषण आग लागल्याने मृतदेह पूर्णतः जळून गेला होता. मृतदेह ओळखण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. वडील राजेंद्र आणि भाऊ विघ्नेश सोनघरे अहमदाबाद येथे गेले होते. डीएनए चाचणी यशस्वी झाल्यानंतर बुधवारी रोशनी यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी मध्यरात्री मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी डोंबिवलीत अंत्यसंस्कार करण्यात आले.स्वर्गारोहण रथातून आणलेल्या रोशनी हिच्या पार्थिवावर वडील राजेंद्र यांनी अत्यंविधी केला. अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. पूर्वेकडील राजाजी पथ परिसरात रोशनी आपल्या आई-वडील आणि भावासोबत राहत होती. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाची, हसतमुख रोशनी ही सोशल मीडियावरही सक्रिय होती. तिच्या इन्स्टाग्रामवर ५४ हजारांहून अधिक अनुयायी होते. पूर्वी ती स्पाईस जेटमध्ये होती आणि गेली दोन वर्षे एअर इंडियामध्ये कार्यरत होती.
मंडणगडची क्रू मेंबर रोशनी राजेंद्र सोनघरे हिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार
