ठाणे : शहरात रविवारपासून सुरू असलेल्या पावसाचा सोमवारी दुपारी जोर वाढला. याचदरम्यान, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आणि यानंतर मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
असे असले तरी ठाणे शहरात मात्र सुट्टी निर्णय घेण्यात आला नव्हता. दुपारी ४ वाजेनंतर शाळा सुट्टीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला खरा पण, तोपर्यंत शाळा सुटण्याची वेळ झाली होती. मंगळवारीही रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशानसाने मंगळवारीही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरात पाऊस पडत आहे. रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता. सोमवारीही शहरात पाऊस सुरू होता. सकाळी १० वाजेनंतर पावसाचा जोर वाढू लागला. मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परंतु, ठाणे शहरातील शाळा मात्र सुरूच होत्या. पावसाचा जोर पाहून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची वाट न पहाता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काही शाळांनी स्वत:हून दुपारच्या सत्रातील मुलांना सुट्टी जाहीर केली. परंतु या शाळेतील मुले शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचली आणि त्याच वेळी शाळा प्रशासनाकडून सुट्टीचा संदेश पालकांना प्राप्त होताच ते आपल्या पाल्याला पुन्हा घरी घेऊन गेले. तर, शाळा बसचालकांनी शाळेजवळून बस माघारी फिरवून विद्यार्थ्यांना पुन्हा घरी सोडले.
काही शाळांनी सुट्टी दिली असली तरी अनेक शाळा प्रशासन मात्र जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहत थांबले होते. परंतु रेड अलर्टमुळे मुंबईत सुट्टी दिली असल्यामुळे ठाण्यातही सुट्टी जाहीर होईल, अशी आशा पालकांना होती आणि तेही शाळा प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत थांबले होते. अखेर दुपारच्या सत्रातील मुलांना पालकांनी शाळेत सोडले आणि शाळा प्रशासनाने वर्ग भरवून मुलांना शिकविण्यास सुरूवात केली. शाळा सुटण्यासाठी दोन तास शिल्लक राहिले असतानाच, जिल्हा प्रशासनाने सुट्टीचा निर्णय जाहीर केला. तसे परिपत्रकही काढले. यानंतर अचानकपणे शाळा लवकर सोडण्यात येणार असल्याने शाळा प्रशासनासह पालकांची तांरबळ उडाली.
मंगळवारी शाळांना सुट्टी
मुंबईसह ठाणे शहराला मंगळवारीही रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेला गोंधळ टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. तसे परिपत्रक जिल्हा प्रशासनाने काढले आहे.