अतिउत्साही व मद्यपी पर्यटकांवर बसणार चाप, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची वाढतेय गर्दी
लांजा : तालुक्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वत रांगांच्या माळरानावर वसलेल्या व मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माचाळ पर्यटन येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चेकिंग नाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माचाळ येथे दिवसेंदिवस पर्यटकांची वाढती गर्दीच्या दृष्टीने चेक नाका अत्यंत गरजेचे असल्याचे माचाळ स्थानिक नागरिकांसह अभ्यासु पर्यटकांमधून व्यक्त होत होते. अतिउत्साही, मद्यपी पर्यटकांवर अंकुश लगावण्यासाठी पालू ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने चेकनाका उभारण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच सागर गाडे यांनी दिली.
लांजा तालुक्याच्या पूर्व दिशेला असलेले मिनी महाबळेश्वर म्हणून नावारूपाला आलेले माचाळ गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. येथील घनदाट जंगल, अचानक नजरेस पडणारे वन्यजीव, थंडगार पाणी, दाट धुके, मुचकुंदी ऋषी यांची गुहा, येथील लोकवस्तीची जीवन पद्धती, अनुभवता येते. इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या माचाळ गावापासून अवघ्या दोन किमी अंतरावर विशाळगड आहे. सह्याद्रीच्या कडेवर असलेली मुचकुंदी ऋषींची गुहेला पर्यटक आवर्जून भेट देत असतात. हिल स्टेशन म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या माचाळ गावाकडे पर्यटकांची पाऊले उन्हाळी, पावसाळी व हिवाळी या तिनही ऋतू मध्ये वळत आहेत. त्यामुळे लांजा तालुक्याच्या पर्यटन विकासाला माचाळच्या रूपाने चालना मिळू लागली आहे. येथिल पर्यटनाला अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासक, सुज्ञान नागरिकामधून व्यक्त होते आहे.
सद्या पावसाळा सुरू असून पावसाळ्यात माचाळचे वातावरण येथील पर्यटकांना अधिक आकर्षित करत आहे. पावसाळी दुधाळ धुके, थंड वारा, हिरवीगार वनराई, निळेशार सह्याद्रीचे डोंगरकडे, कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, पर्वत उंच रांगांवरून दिसणारा लांजा व संगमेश्वर तालुक्यातील गावांचा भु-भाग, त्यामुळे तालुका, जिल्हा यासह परजिल्ह्यातील पर्यटक माचाळच्या सानिध्यात रममान होताना दिसत आहेत. सद्या पाऊस जोरदार सूर्य असून प्रत्येक दिवशी पर्यटक माचाळ गावात वर्षा सहलीचा आनंद घेताना दिसत आहेत. माचाळच्या दिशेने पर्यटक वाढले आणि हळूहळू येथील आर्थिक गणित स्थिर होऊ लागले आहे. येणाऱ्या पर्यटकांना जेवण, नास्टा करून देण्याची व्यवस्था येथील नागरीकांनी।स्वतःच्या घरांमध्ये सुरू करून दिल्याने पर्यटक समाधानी होत आहेत. भविष्यात स्थानिक नागरिकांना हॉटेल, दुकाने उभारण्याची संधी मिळणार आहे. मात्र येथील पर्यटनावर स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
माचाळ गावात पर्यटकांचा वाढता कल पाहता अतिउत्साहामुळे तर कधी मद्य सेवन या प्रकारामुळे पर्यटकांना व स्थानिक नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. लांजा तालुक्यातील माचाळ येथील पर्यटनाला सद्याच सुरुवात झाली असून स्थानिकांसा पर जिल्ह्यातील, अनेक कुटुंब, यासह कॉलेज युवक, युवती, नागरिक माचाळ पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. अतिउत्साही व मद्य सेवन करणाऱ्या पर्यटकांकडून माचाळ पर्यटनाला बाधा पोहचू नये यासाठी पालू- माचाळ गृप ग्रामपंचायतीकडून खबरदारी घेण्यात येणार आहे. माचाळ पर्यटनाच्या प्रवेश ठिकाणी एक चेक नाका उभारण्यात येणार आहे अशी माहिती पालू-माचाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सागर गाडे यांनी सांगितले. त्या दृष्टीने ग्रामपंचायतीने हालचाली सुरू केल्या असून लवकरच माचाळ पर्यटन ठिकाणी मद्य सेवन, व अतिउत्साही पर्यटकांना चाप बसणार आहे. यासह चेक नाकाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला उत्पन्नही प्राप्त होणार आहे.
माचाळ पर्यटन येथे ग्रामपंचायत उभारणार चेकनाका
