उपविभागीय अभियंता यांचे लेखी आश्वासन,आमदार श्री शेखर निकम यांची यशस्वी शिष्टाई
संगमेश्वर: उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देवरुख यांच्या लेखी आश्वासनामुळे आणि आमदार श्री शेखर निकम यांचे यशस्वी मध्यस्थीने वाशी तर्फे संगमेश्वर पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी उद्या गुरुवारी दिनांक 16 रोजी आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित केल्याची माहिती वाशी सरपंच सौ तन्वी गानू यांनी दिली.
तेर्ये ते वाशी किंजळे पर्यंत जोडणारा मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे सदर रस्ता वाहतुकीस घोकादायक झाला आहे. या रस्ताची त्वरित डागडुजी करून संपूर्ण रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे यासाठी वाशी सरपंच सौ गानू यांनी संबंधीत बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांचे कडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. आमसभेत सुद्धा या बाबत मुद्दा उपस्थित केला. यावेळी आमदार श्री निकम यांनी लवकरच रस्त्यातील खड्डे भरून संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण करून अतिशय चांगला करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
मात्र खड्डे बुजावण्याची तसदी सुद्धा संबंधित विभागाने घेतली नाही. तसेच याबाबत पुढे काय प्रगती झाली याचे उत्तर सुद्धा ने दिल्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी गुरुवारी 16 रोजी तेर्ये येथे रास्ता रोको करण्याचा निर्धार केला.
यामुळे प्रशासन जागे झाले. संगमेश्वर चे पोलीस निरिक्षक राजाराम चव्हाण यांनी जमाव बंदी आदेश असल्यामुळे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली. यांनतर उपविभागीय अभियंता शिरीषकुमार गायकवाड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग देवरुख यांनी लेखी सदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर असून लवकरच काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले. यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले आहे.