GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड : बाणकोट येथे गावठी हातभट्टीवर धाड! रसायन जागेवरच नष्ट

Gramin Varta
129 Views

मंडणगड : तालुक्यातील वाल्मीकीनगर येथे बाणकोट सागरी पोलिसांनी एका राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस चालणाऱ्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे १७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे १६० लिटरहून अधिक रसायन जागेवरच ओतून नष्ट करण्यात आले आहे.

बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर निवृत्ती नवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अनंत जगन्नाथ पुसाळकर (वय ६३, रा. वाल्मीकीनगर) या आरोपीच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस ही हातभट्टी सुरू होती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आरोपी गैरकायद्याने गावठी हातभट्टी दारू तसेच दारू गाळण्याचे साहित्य आपल्या ताब्यात आणि कब्जात बाळगलेला आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी २००० रुपये किमतीची २० लीटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. याव्यतिरिक्त, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे घातक रसायन मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले. यामध्ये ७५०० रुपये किमतीच्या १०० लिटर मापाच्या दोन सिंटेक्स प्लास्टिकच्या टाक्या होत्या, ज्यात एकूण सुमारे १५० लिटर कुजके गूळ व नवसागर मिश्रित रसायन होते. तसेच ४५०० रुपये किमतीच्या तांब्याच्या एका मोठ्या हंड्यात १० लिटर गरम कुजके गूळ व नवसागर मिश्रित रसायन मिळून आले. पोलिसांनी हे एकूण १६० लिटर रसायन घटनास्थळीच ओतून नष्ट केले आणि टाक्या फोडून टाकल्या. दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारी १५०० रुपये किमतीची स्टीलची गॅस शेगडी, ९०० रुपयांचा एच.पी. गॅस सिलेंडर आणि १००० रुपये किमतीचे दोन अॅल्युमिनियमचे पातेले देखील जप्त करण्यात आले.

या प्रकरणी आरोपी अनंत पुसाळकर याच्याविरोधात बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू निर्मिती करणारे साहित्य आणि रसायन नष्ट केल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर पोलिसांचे कठोर लक्ष असल्याची चर्चा आहे.

Total Visitor Counter

2645604
Share This Article