रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांवर राहणार विशेष नजर!
नवी मुंबई: राज्याला अमली पदार्थ (ड्रग्स) मुक्त करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे राज्यातील पहिले कार्यालय नवी मुंबईत सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मुंबई वगळता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण परिक्षेत्रातील अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट मोडून काढण्यासाठी हे विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
देशाला अमली पदार्थमुक्त करण्याच्या व्यापक उद्देशाने सरकारच्या हालचाली सुरू असून, त्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये टास्क फोर्स तयार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये या पथकांना मंजुरी मिळाल्यानंतर जून महिन्यात विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत यांच्यावर याची जबाबदारी सोपवण्यात आली. कोकण विभागाच्या या टास्क फोर्सला कार्यान्वित होण्यासाठी जागेची आवश्यकता होती, ती गरज पूर्ण करत नवी मुंबईतील सानपाडा पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली.
या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत आणि अतिरिक्त अप्पर पोलिस अधीक्षक गणेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. उप अधीक्षक रामचंद्र मोहिते यांच्यावर कोकण परिक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या पथकात सध्या जवळपास तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा देण्यात आला आहे. नवी मुंबईसह ठाणे, रायगड परिसरात या पथकाने यापूर्वीच अनेक ड्रग्स माफियांचे मोठे अड्डे उद्ध्वस्त करून महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. मात्र, कोकण परिक्षेत्राचे विशाल कार्यक्षेत्र पाहता, भविष्यात या पथकाचे मनुष्यबळ वाढवण्याची गरज भासू शकते, असे संकेत मिळत आहेत. या पहिल्या कार्यालयाच्या स्थापनेमुळे कोकण विभागातील अमली पदार्थविरोधी मोहीमेला मोठी गती मिळणार आहे.