GRAMIN SEARCH BANNER

महिलांना शेअर मार्केट आणि बँक गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३५ लाखांची फसवणूक; तरुण गजाआड

रत्नागिरी: शेअर मार्केट आणि कोटक महिंद्रा बँकेत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तीन महिलांची तब्बल ३५ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाला रत्नागिरी पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. प्रथम खानविलकर (रा. नाचणे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

ही फसवणुकीची घटना मार्च २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली. पीडित महिलांपैकी एका महिलेने रविवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयित प्रथम खानविलकर याने फिर्यादी महिलेसह इतर दोन महिलांना शेअर मार्केट आणि कोटक महिंद्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. त्याने जास्त परताव्याचे आमिष दाखवून या महिलांकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने स्वतःच्या खात्यात एकूण ३४ लाख ८९ हजार रुपये जमा करून घेतले.

दरम्यान, अपेक्षित परतावा न मिळाल्याने आणि गुंतवलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे या महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सागर वाळुंजकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर, अमित पालवे, अमोल भोसले आणि शरद जाधव यांच्या पथकाने वेगाने तपास करत २४ तासांच्या आत संशयित प्रथम खानविलकर याला रत्नागिरीतून अटक केली.

Total Visitor Counter

2475110
Share This Article