मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी विसर्जनाला गर्दी होत असताना मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यातील मोसमात समुद्रकिनाऱ्यांवर ‘ब्लू बटन जेलीफिश’ आणि ‘स्टिंग रे’ प्रजातीचे मासे दिसतात.
यांचा दंश नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे विसर्जनावेळी काळजी घ्यावी, असे पालिकेने म्हटले आहे. गिरगाव, जुहू, वर्सोवा आदी चौपाट्यांवर या प्रजातींचा वावर आढळतो. त्यामुळे समुद्राच्या खोल पाण्यात जाणे टाळावे, उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये आणि पायाचे संरक्षण करण्यासाठी गमबूटांचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी विभागीय अधिकाऱ्यांना समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या माहितीनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात समुद्रात या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळतात. किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह असल्याने अशा जलचरांचे संगोपन होते आणि त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्क राहणे आवश्यक आहे.
गणेश विसर्जनावेळी जीवरक्षक आणि वैद्यकीय पथक चौपाट्यांवर तैनात करण्यात आले आहे. वैद्यकीय कक्षांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला असून काही ठिकाणी १०८ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जेलीफिशचा दंश झाल्यास तीव्र खाज सुटते, तर स्टिंग रेच्या दंशामुळे जखमेच्या जागी आग लागल्यासारखे वाटते. अशा प्रसंगी घाबरून न जाता त्वरित नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दंश झाल्यास स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावेत, जखम चोळू नये, ती स्वच्छ पाण्याने धुवून काढावी आणि बर्फाचा वापर करावा, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. तसेच चौपाट्यांवर लावण्यात आलेले सूचना फलक, उद्घोषकांद्वारे होणाऱ्या घोषणा आणि नागरी गणेशोत्सव समितीच्या सूचनांचे पालन करावे, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे. लहान मुलांना पाण्यात उतरू देऊ नये आणि विसर्जन पूर्णपणे सुरक्षित वातावरणात व्हावे, यासाठी पालिकेने विशेष उपाययोजना आखल्या आहेत.
मुंबईच्या किनाऱ्यावर ब्लू जेलीफिश व स्टिंग रेचा वावर; पालिकेचा इशारा
