राजापूर :तालुक्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, आता चोरट्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागाकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतून दुचाकी चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना पुढे आली आहे. मात्र, काही जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला.
गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात नाटे, कोदवली आणि कोंडये यांसारख्या ग्रामीण भागांत चार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. यामुळेच चोरट्यांचे धाडस वाढले असून, त्यांनी आता थेट शहराला लक्ष्य केले आहे.
रविवारी रात्री ११:३० च्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका पार्क केलेल्या दुचाकीभोवती दोन तरुण संशयास्पद रित्या वावरताना काही जागरूक नागरिकांच्या नजरेस पडले. या नागरिकांनी त्यांना हटकल्यानंतर, त्या दोघांनी तात्काळ धूम ठोकली. त्यामुळे दुचाकी चोरण्याचा त्यांचा प्रयत्न फसला.
या घटनेमुळे शहरात दुचाकी चोरट्यांची भीती वाढली असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी आता शहराकडे आपला मोर्चा वळवल्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकी पार्क करणे धोकादायक बनले आहे. या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नसली तरी, पोलिसांनी त्वरित दखल घेऊन वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.