GRAMIN SEARCH BANNER

गुहागर: वरवेली-निवोशी रस्त्याची दयनीय अवस्था; बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने नागरिक हैराण

गुहागर/ उदय दणदणे: कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच, गुहागर तालुक्यातील वरवेली-निवोशी जोड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे वरवेली-रांजाणेवाडी ते निवोशी गावाकडे जाणारा सुमारे ५०० मीटरपेक्षा अधिक रस्ता पूर्णपणे उखडला असून, जागोजागी मोठे चर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी, दैनंदिन कामांसाठी ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

२४ वर्षांपासून रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

सदर रस्ता २००१ साली पूर्ण झाला असला तरी, गेल्या २४ वर्षांत केवळ वरवेलीकडून एक किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. उर्वरित रस्ता अजूनही कच्चाच आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याची दुतर्फा झाडी साफसफाई करणे आणि खड्डे बुजवणे अशी कामे दरवर्षी निवोशीमधील नाणेवाडी, कातळवाडी, गणेशवाडी येथील ग्रामस्थ स्वतःहून करतात. मात्र, संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांना हाताशी धरून कामांची खोटी बिले काढून निधीची अफरातफर करतात का, असा संतप्त सवाल निवोशी गावचे सामाजिक कार्यकर्ते विजय अवेरे यांनी उपस्थित केला आहे.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष

याबाबत स्थानिक जागृत विकास मंडळाचे अध्यक्ष विजय अवेरे यांनी माहिती अधिकाराखाली मागील १० वर्षांची माहिती मागवून या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, “या कामासाठी कोणताही निधी उपलब्ध नाही,” असे थातूरमातूर उत्तर त्यांना देण्यात आले. एवढेच नव्हे, तर या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे स्थानिक लोकप्रतिनिधीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अवेरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला.

मळण ते निवोशी-पालशेत रस्त्याचीही अवस्था बिकट आहे. या रस्त्यावरील झाडी साफ करणे आणि खड्डे बुजवण्याचे काम दरवर्षी मळण तळेकोंड, निवोशी नाणेवाडी, कातळवाडी, गणेशवाडी आणि भेलेवाडी येथील ग्रामस्थ करतात. मात्र, बांधकाम विभाग (PWD) या कामांची बिले ठेकेदारांना देत असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात या भागात अशी कामे होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन गुहागर तहसीलदारांनी तातडीने संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यांनी वरवेली-निवोशी रस्त्याच्या दुरुस्तीसह मळण-निवोशी-पालशेत रस्त्याचीही देखभाल करावी आणि वरवेली-निवोशी रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करून दर्जोन्नती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने यावर तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.

Total Visitor Counter

2474907
Share This Article