रायगड: अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले.
परंतु, हा सर्व खर्च पहिल्याच पावसात वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी रुग्णालयात साचत असल्याचा प्रकार घडत असताना डायलेसिस सेंटरजवळ तसेच एक्स-रे विभागात स्लॅब कोसळण्याची घटना बुधवारी आणि गुरुवारी घडली. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय 250 खाटांचे असून, या रुग्णालयात हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील मेल सर्जिकल वॉर्डमध्ये पावसाचे पाणी साचले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पाणी काढले. परंतु, हा प्रश्न आजही कायमच असताना, रुग्णालय प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे का? रुग्णांचा जीव रुग्णालयात सुरक्षित नाही असा सर्व सामान्य नागरिकांना प्रश्न पडत आहे.
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पुन्हा दुरुस्ती करण्यायोग्य रुग्णालय असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले. त्यानंतर सुमारे 6 कोटींहून अधिक खर्च इमारतीच्या दुरुस्तीसाठी करण्यात आला. स्लॅब टाकण्यापासून खिडकी दुरुस्ती, प्लास्टर अशा अनेक प्रकारची कामे करण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात रुग्णालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. एक्स-रे विभागात बुधवारी एक पीओपीचा तुकडा पडला. त्यानंतर गुरुवारी सकाळी रुग्णालयाच्या अपघात विभाग व डायलेसीस सेंटरलगत रहदारीच्या ठिकाणी एक स्लॅब कोसळला.
सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली केलेला खर्च पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनता करीत आहे.
रायगड – जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था

Leave a Comment