पुणे: अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला नुकत्याच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, संबंधित ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेने मागणी केल्याच्या चर्चांना केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी पूर्णविराम दिला आहे. मंगळवारी पुण्यात आयोजित ७ व्या हेलिकॉप्टर आणि लघु विमान परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नायडू यांनी स्पष्ट केले की, विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) भारतातच सुरू आहे आणि ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही. यावेळी केंद्रीय हवाई नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
नायडू यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याबाबत काही माध्यमांतून चर्चा झाल्या असल्या तरी, त्या केवळ अफवा आहेत. प्रत्यक्षात तपासणी देशातच सुरू असून, ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या वेग, उंची, इंजिन बिघाड आणि इतर महत्त्वाची माहिती रेकॉर्ड केलेली असते. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एअर बस विमानाने उड्डाण घेतल्यावर काही सेकंदातच अपघात घडला होता. त्या घटनेनंतर ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर लगेच तपासणी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
हेलिकॉप्टर अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यावर भर
मंत्री नायडू यांनी चारधाम यात्रेदरम्यान गेल्या आठवड्यात हेलिकॉप्टर अपघात होऊन सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरही चिंता व्यक्त केली. चारधाम यात्रेत भाविकांची मोठी गर्दी होत असते, आणि हवामानात अचानक बदल झाल्यावर हेलिकॉप्टर अपघाताची शक्यता अधिक असते, हे त्यांनी मान्य केले. यासाठी हवामान निरीक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून माहिती संकलन केले जाणार आहे. केदारनाथ व बद्रीनाथमध्ये सुरक्षित हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नायडू यांनी सांगितले. देशात हेलिकॉप्टर अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये, प्रवासात पर्यटकांची सुरक्षा वाढावी यावर भर देण्यात येत आहे. तसेच, डोंगराळ भागात एअर ट्रॅफिक कंट्रोलचे व्यवस्थापनही सुधारण्यात येणार असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले.
या घोषणांमुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर असून, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करत असल्याचा विश्वास प्रवाशांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे.