खेड : कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची कमतरता; रुग्णसेवेवर परिणाम, रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी

Gramin Varta
56 Views

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही महिन्यांपासून विविध पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. कर्मचारी संख्या अपुरी असल्याने रुग्ण, ग्रामस्थ तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी जोरदार मागणी खारीपट्टा परिसरातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोठ्या लोकसंख्येला आरोग्यसेवा पुरविली जाते. या केंद्रातील काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून, काहींच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र त्यांच्या रिक्त जागांवर अद्याप नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. विशेषतः सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असल्याने आरोग्य केंद्राच्या दैनंदिन व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, त्यांच्याकडून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकारी व विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे, पावसाळ्यात सर्पदंश, विंचूदंश तसेच अन्य विषारी प्राण्यांच्या दंशाच्या घटना वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवस-रात्र सक्षम मनुष्यबळ उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. रात्रीच्या वेळीही पुरुष कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना कर्मचारी संख्या अपुरी असल्याने आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मुख्यालयातील आरोग्य सेविका पदही रिक्त

कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्यालयातील आरोग्य सेविका पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. या पदावर दापोली तालुक्यातील साखलोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका महिला कर्मचाऱ्यांची १४ मे २०२६ रोजी प्रशासकीय बदली करण्यात आली होती. मात्र संबंधित कर्मचारी अद्याप कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झालेल्या नसल्याने हे पद रिक्तच आहे.

या केंद्राअंतर्गत आठ उपकेंद्रे आणि एक मुख्यालय अशा एकूण नऊ आरोग्य सेविकांची आवश्यकता असताना सध्या केवळ दोन कायमस्वरूपी आणि दोन कंत्राटी (NHM) आरोग्य सेविका कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रात नियमित भेटी देणे आणि सर्व भागातील नागरिकांना आवश्यक आरोग्यसेवा पुरविणे कर्मचाऱ्यांना कठीण होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.

दरम्यान, या प्रश्नाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आटले यांच्याकडे अनेकदा मागणी केल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.

तातडीने पदे भरण्याची मागणी

कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत, मुख्यालयातील आरोग्य सेविका पदावर संबंधित कर्मचाऱ्याला त्वरित रुजू करून घ्यावे, तसेच आवश्यक ते सफाई व पुरुष कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या प्रश्नाकडे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आटले, मुख्य कार्यकारी अधिकारी, खेड तालुक्याचे आरोग्य अधिकारी तसेच संबंधित लोकप्रतिनिधी अरुण कदम यांनी तातडीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करावी आणि खारीपट्टा परिसरातील नागरिकांना योग्य व वेळेवर आरोग्यसेवा मिळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Total Visitors :
4730163
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *