नाशिकच्या उधमाळची ऐतिहासिक झेप; भारतातील पहिले ‘डार्क स्काय कम्युनिटी’ गाव होण्याच्या मार्गावर

Gramin Varta
17 Views

खगोल पर्यटनाला मिळणार नवी दिशा; ४२.१४ लाखांच्या निधीतून राबविणार महत्त्वाकांक्षी उपक्रम

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील उधमाळ गावाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, भारतातील पहिले ‘डार्क स्काय कम्युनिटी’ गाव होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या उपक्रमामुळे नाशिकला खगोल पर्यटन अर्थात ‘अ‍ॅस्ट्रो-टुरिझम’ क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उधमाळ येथील नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि अंधारमय आकाश अवकाश निरीक्षणासाठी अत्यंत अनुकूल असल्याने या ठिकाणी खगोल अभ्यास, आकाश निरीक्षण आणि वैज्ञानिक उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनाबाबत आवड निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक निधीला नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना २०२६-२७ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून या उपक्रमासाठी ४२.१४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

उधमाळ ग्रामसभेने पेसा कायद्यांतर्गत अंधारमय आकाशाचे संवर्धन करण्यासाठी आणि जबाबदार बाह्य प्रकाशयोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी सुरक्षित, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रकाश व्यवस्था राबविण्यावर या माध्यमातून भर देण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, प्रकाश व्यवस्थेतील सुधारणा, नागरिकांमध्ये जनजागृती, तसेच स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यासारखे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्य शासनाच्या प्रस्तावित ‘राज्य डार्क स्काय धोरणा’शी हा उपक्रम सुसंगत असून, रात्रीच्या आकाश संवर्धनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्हा राज्यात आघाडी घेईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

खगोल पर्यटनाच्या माध्यमातून उधमाळ आणि परिसरातील गावांना शाश्वत पर्यटनाची नवी संधी उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक वारसा जपत पर्यटकांना आकाश निरीक्षणाचा अनोखा अनुभव देण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि उपजीविकेच्या नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

रात्रीचे गडद आकाश हे मानवाच्या ज्ञान आणि संशोधनाचा प्राचीन स्रोत मानले जाते. उधमाळचे हे नैसर्गिक वैशिष्ट्य जपताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित करणे, प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि पर्यावरणपूरक प्रकाश व्यवस्थेबाबत जनजागृती करणे यावर भर दिला जाणार आहे.

डार्क स्काय इंटरनॅशनल या जागतिक स्तरावरील संस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेला हा उपक्रम रात्रीचे नैसर्गिक वातावरण, जैवविविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उधमाळचे ‘डार्क स्काय कम्युनिटी’ म्हणून होणारे संभाव्य नामांकन नाशिकसाठीच नव्हे तर देशासाठीही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरणार आहे.

Total Visitors :
4638880
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *