बीड: मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे,आपण हयात असेपर्यंत मराठा समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळाल्याचे पाहायचे आहे, असे निर्वाणीचे विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले.
मराठा समाजाने केवळ आरक्षणावर अवलंबून न राहता सत्ता आणि प्रशासनात आपले स्थान निर्माण करण्याचे आवाहनही जरांगेंनी केले आहे. जर शासक बनलात, तर कोणाकडेही काही मागायची गरज लागणार नाही.
बीड जिल्ह्याच्या नारायण गड येथे त्यांची सभा झाली. दसरा मेळावाच्या निमित्ताने त्या सभेत जरांगे बोलत होते.
जरांगे पुढे म्हणाले की, मराठा समाजाने ७५ वर्षांची लढाई जिंकून जीआर मिळवला आहे. त्यामुळे आता त्यांना कोणतीही चिंता वाटत नाही. गरीब मराठा समाज होरपळताना दिसत होता, म्हणूनच आपण हे काम हाती घेतले. आपल्या या लढ्यात कधीतरी मागे सरकलो असेल किंवा एखादी चूक झाली असेल, पण आपण कधीही नाटक केले नाही किंवा खोटे बोललो नाही. समाजाचा हट्ट आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस झटत राहिलो. ६ कोटी मराठा लेकरांना सुखी आणि समाधानी राहण्याचे आवाहन केले.
प्रकृती खालावली असतानाही जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगर येथून रुग्णवाहिकेतून नारायणगड येथील दाखल झाले. त्यांनी आरक्षणाच्या लढ्यात गद्दारी करणाऱ्या आणि फितुरी करणाऱ्यांवर कठोर टीका केली. सातारा आणि हैदराबाद गॅझेट मधील काही लोकांनी केलेल्या फितुरीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण केवळ दोन वर्षांत ३ कोटी गरीब मराठ्यांना आरक्षणात आणले असून, गावंच्या गावं कुणबी निघाली आहेत. म्हणून, समाजाने हुशारीने वागून मिळालेल्या आरक्षणात समाधानी राहावे आणि समाजाला अडचणीत आणणारे वर्तन टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
मराठ्यांनी आरक्षणावर अवलंबून न राहता सत्ता आणि प्रशासनात स्थान निर्माण करावे – मनोज जरांगे पाटील
