GRAMIN SEARCH BANNER

टाकीत अडकलेल्या चार सापांना वर्ल्ड फॉर नेचरच्या बचाव पथकाने दिले जिवदान

Gramin Varta
34 Views

खेड: निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या वर्ल्ड फॉर नेचर रत्नागिरी जिल्हा शाखेच्या बचाव पथकाने आणखी एक यशस्वी आणि धाडसी बचाव मोहिम पूर्ण केली.

घाणेकुंट मधलीवाडी येथे एका चिऱ्याच्या टाकीमध्ये साप अडकले असल्याची माहिती सुरज निकम यांनी संस्थेच्या कार्यालयात दूरध्वनीद्वारे दिली. ही माहिती मिळताच खेड येथील सर्पमित्र ऋषिकेश चव्हाण आणि खेड तालुका प्रमुख सर्पमित्र आर्यन मोहिते त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

टाकीची पाहणी केली असता त्यामध्ये केवळ एक नव्हे तर तब्बल चार साप अडकल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये एक धामण, एक भारतीय नाग आणि दोन घोणस यांचा समावेश होता. परिस्थिती पाहता सापांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेऊन दोन्ही सर्पमित्रांनी लगेच बचाव कारवाई सुरू केली. अत्यंत कुशलतेने आणि सुरक्षित पद्धतीने चारही सापांना पकडण्यात आले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांना याची माहिती देऊन नियमांनुसार सर्व सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. या कारवाईदरम्यान ग्रामस्थांनीही सुटकेचा श्वास सोडला.


या संपूर्ण बचाव कार्यासाठी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री. शुभम पांडे, राज्याध्यक्ष सन्मा. श्री. अभिजित वाघमोडे, राज्याध्यक्ष सन्मा. श्री. अनिल राऊत, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. प्रथमेश पवार, उपजिल्हाध्यक्ष सन्मा. श्री. रोहित यादव, जिल्हा सचिव सन्मा. प्रसाद विचारे, उपजिल्हा सचिव सन्मा. श्री. निलेश पडवेकर आणि सन्मा. श्री. निलेश बुरटे यांचे मार्गदर्शन लाभले.
रेस्क्यूदरम्यान सर्पमित्र ऋषिकेश चव्हाण, तालुका प्रमुख सर्पमित्र आर्यन मोहिते, रोटरी क्लब खेडचे सदस्य सुरज निकम, दत्ताराम धापसे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांना सापांबाबत जागरूकता आणि योग्य माहिती देण्यात आली.
संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, कुठेही साप, वन्यजीव किंवा पक्षी अडचणीत, जखमी किंवा धोकादायक परिस्थितीत आढळल्यास महाराष्ट्र वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाइनवर त्वरित संपर्क साधावा.

Total Visitor Counter

3199515
Share This Article