GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरात चौपदरीकरणामुळे घरांना तडे; माभळेतील प्रकार, ग्रामस्थांमध्ये भीती

Gramin Varta
83 Views

संगमेश्वर : मुंबई–गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते माभळे दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे माभळे गावातील काही घरांना तडे जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई–गोवा महामार्गावरील संगमेश्वर–माभळे टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम तब्बल १७ वर्षे रखडले होते. रखडलेल्या सोनवी पुलासह या मार्गावरील काम अखेर ठेकेदार कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे. गणेश हॉटेल ते पुनर्वसन परिसरादरम्यान रस्ता रुंदीकरण सुरू असून, या दरम्यान मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन करण्यात येत आहे.
माभळे येथील रहिवासी डॉ. हर्षदा डिंगणकर यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाई सुरू असून, ही खोदाई हद्दरेषेबाहेर केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घरांच्या सुरक्षिततेचा कोणताही अंदाज न घेता उत्खनन सुरू असल्याने त्यांच्या घराला तडे जाऊ लागले आहेत.

तसेच उज्वला खापरे आणि घडशी यांच्या घरांकडे जाण्यासाठी समोरील मार्ग ठेवण्यात आलेला नाही. याबाबत कोणताही मोबदला मिळालेला नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. चौपदरीकरणाची सीमारेषा निश्चित असतानाही ती वारंवार बदलली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम वाढला आहे. कामाच्या पद्धतीमुळे जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी ठेकेदार कंपनी व संबंधित प्रशासनाकडे तातडीने संरक्षण भिंत उभारणे, सुरक्षित उत्खनन करणे, बाधितांना योग्य मोबदला देणे आणि चौपदरीकरणाची सीमारेषा स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

Total Visitor Counter

3374849
Share This Article