प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अधिकृत घोषणा
राजापूर :- राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी जितेंद्र खामकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे नुकत्याच पार पडलेल्या मुलाखतीदरम्यान खामकर यांची निवड करण्यात आली. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
खामकर यांची निवड राजापूरच्या काँग्रेस नेत्या आणि माजी विधान परिषद आमदार ऍड. हुस्नबानू खलिफे यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजापूर तालुकाध्यक्ष पद रिक्त होते. त्यानंतर बराच कालावधी लोटल्यानंतर आता ही नियुक्ती झाली आहे. खामकर हे काँग्रेसचे जुने आणि अनुभवी कार्यकर्ते असून त्यांनी माजी मंत्री कै. भाईसाहेब हातनकर यांच्यासोबत कार्य केले आहे. तसेच, त्यांनी पंचायत समितीची निवडणूकही लढवली आहे.
खामकर यांच्या नियुक्तीनंतर राजापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रदेश काँग्रेस कार्यालयाने सूचित केले आहे की, या निवडीनंतर १५ दिवसांच्या आत संपूर्ण तालुका कार्यकारिणी तयार करून ती प्रदेश कार्यालयाकडे सादर करावी लागेल.