GRAMIN SEARCH BANNER

“पक्ष्यांच्या पक्षात राहून त्यांनी
लिखाण केलं…”: धीरज वाटेकर

चिपळुणात अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना शब्दश्रद्धांजली

चिपळूण : “जंगलात राहून, पक्ष्यांच्या पक्षात मिसळून, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी जे लिखाण केलं, ते केवळ साहित्य नव्हे, तर ती एक सजीव अनुभूती आहे. त्यांच्या लेखनाला शास्त्राचा आधार आहे का, असा प्रश्नच चुकीचा आहे,” अशा शब्दांत लेखक व पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी चितमपल्ली यांच्या कार्याला शब्दश्रद्धांजली अर्पण केली.

लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, ग्लोबल चिपळूण टुरिझम आणि ॲक्टिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सायंकाळी बाळशास्त्री जांभेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

चितमपल्ली यांच्या साहित्याविषयी बोलताना वाटेकर म्हणाले, “ते निसर्गात राहिले, जंगलाशी नातं जोडलं. त्यांच्या लेखनावर अनेकदा टीका झाली, पण त्यांनी कधीही मार्ग सोडला नाही. एकाग्रतेनं, निष्ठेनं त्यांनी आपलं म्हणणं लिहून ठेवले. सामान्य वाचकांनी त्यांना उचलून धरलं, कारण त्यांनी अनुभवातून, संवेदनातून लेखन केलं होतं.”

वाटेकर यांनी २०२३ मध्ये सोलापूरमधील चितमपल्ली यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीचा उल्लेख करत सांगितले, “विलास महाडिक आणि मी जवळपास अडीच तास त्यांच्याशी संवाद साधला. त्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांनी कोकणाविषयीही अनेक विचार मांडले, प्रश्न उपस्थित केले.”

या वेळी माजी नगरसेवक रामशेठ रेडीज यांनी धामणवणे जंगलातील त्यांच्या सहवासाच्या आठवणी सांगितल्या, तर पत्रकार योगेश बांडागळे यांनी चितमपल्ली यांच्या साहित्यावर आधारित स्मारक आणि ग्रंथसंग्रह केंद्र व्हावे, अशी कल्पना मांडली. विलास महाडिक यांनी बोटिंगचा अनुभव कथन केला.

या श्रद्धांजली सभेला साहित्यिक व अभ्यासक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष कवी अरुण इंगवले, माजी नगरसेवक रामशेठ रेडीज, निसर्ग अभ्यासक विलास महाडिक, माजी नगरसेविका सीमा चाळके, आंबेडकर वाचनालयाचे प्रदीप पवार, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे विश्वास पाटील, कैसर देसाई, समीर कोवळे, पत्रकार योगेश बांडागळे, विनायक ओक, मंदार चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते. समीर कोवळे यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.

चितमपल्ली यांची आठवण आणि त्यांच्या विचारांची पेरणी ही नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, ही भावना कार्यक्रमात वारंवार व्यक्त झाली. अरण्याशी नातं सांगणाऱ्या चितमपल्लींच्या आठवणींनी सभागृह भारून गेलं.

Total Visitor

0214475
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *