GRAMIN SEARCH BANNER

फुणगूस येथील नवजीवन विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Gramin Varta
116 Views

संगमेश्वर: शास्त्री परिसर विद्या विकास संस्था संचलित नवजीवन विद्यालय फुणगूस येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता शाळेचे माजी शिक्षक श्री. श्रीधर जोशी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला निवृत्त पोलीस श्री. कृष्णात (आबा) भोसले, निवृत्त माजी सैनिक धनाजीराव पाटील, व्यावसायिक श्री. गजानन लांजेकर, ग्रामस्थ श्री. नाना भोसले, सौ. वैशाली नलावडे, सौ. तब्बसुम खान, माजी विद्यार्थी श्री. प्रमोद शिंदे, श्री. संदीप पवार, सौ. श्रद्धा भोसले, श्री. जयतेश कदम यांच्यासह चिमुरड्या पूर्वी लांजेकर व माऊ भोसले यांची विशेष उपस्थिती होती. राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत गायनानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एरोबिक डान्स, सामूहिक कवायत, डंबेल्स व लेझीमचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली घुंगुर काठी कवायत आणि सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांचे बैठे कवायत प्रकार कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

कार्यक्रमाच्या शेवटी दरवर्षीप्रमाणे रिक्षा चालक-मालक संघटना, श्री. आबा भोसले, श्री. प्रकाश भोसले आणि माजी सैनिक श्री. पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. तसेच श्री. मुज्जमिल मुजावर यांनी केळी व बिस्किटे, तर श्री. प्रमोद शिंदे यांनी जिलेबीचे वाटप केले. माजी शिक्षक श्री. जोशी सर यांनी विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी एक हजार रुपयांची रोख देणगी दिली. या सर्व उपक्रमांचे नियोजन मुख्याध्यापक श्री. सुनील आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. सौ. कारंडे मॅडम यांनी सर्व उपस्थित पाहुणे आणि देणगीदारांचे आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंदूभाई देशपांडे, सचिव श्री. दिलीपभाई कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. अरुण डिंगणकर आणि शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केले. श्री. घडशी यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रण केले आणि मुख्याध्यापकांच्या अधिकृत घोषणेनंतर खाऊ वाटप करून या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

Total Visitor Counter

3225533
Share This Article