खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या खेड बस स्थानकाला सध्या समस्यांच्या गर्तेने वेढले असून, या परिसरात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. एकेकाळी शिस्तबद्ध असलेल्या या स्थानकात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, परिसरात येणाऱ्या प्रवाशांना उग्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असून, एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड बस स्थानकावर सध्या दोन ते तीन स्वच्छता कर्मचारी तैनात आहेत, मात्र त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोणताही अंकुश नसल्याचे चित्र आहे. बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, यामध्ये मद्यपींनी टाकलेल्या दारूच्या बाटल्यांचा खचही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. कर्मचारी नक्की कचरा उचलतात की नाही, असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, बस स्थानकाच्या एका बाजूला व्यापारी वर्ग असून त्यांना या अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सर्वाधिक फटका बसत आहे.
स्वच्छतेसोबतच स्थानकातील बेशिस्त पार्किंगचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. आगारातील अधिकारी, वाहक आणि चालक यांच्या दुचाकी स्थानक परिसरात कुठेही अस्ताव्यस्त उभ्या केल्या जातात. यामुळे बसच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून प्रवाशांना चालणेही कठीण झाले आहे. यावरून अनेकदा प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने प्रवाशांची गर्दी वाढली आहे, अशा स्थितीत प्रशासनाने या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
केवळ स्थानकाची दुरावस्थाच नाही, तर बसच्या वेळापत्रकाबाबतही प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. खेड आगारातून संगलट-फोफलवणे मार्गावर धावणाऱ्या गाड्या वेळेवर सोडल्या जात नाहीत. अनेकदा पूर्वसूचना न देता या मार्गावरील फेऱ्या रद्द केल्या जातात, ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून बस स्थानकाची स्वच्छता करावी, पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा आणि गाड्यांचे वेळापत्रक सुधारावे, अशी आग्रही मागणी आता जनतेतून केली जात आहे. खेड बस स्थानकाचा नावलौकिक टिकवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.







