लांजा : वेरळ येथे आपत्ती निवारण व बचाव कार्याबाबत जनजागृती

Gramin Varta
38 Views

लांजा/फरहान पाटणकर: तालुक्यातील वेरळ येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती निवारण व बचाव कार्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोमवार २२ जून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये तात्काळ प्रतिसाद, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, बचावकार्य आणि प्रथमोपचार यांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

कोकणातील अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे तसेच अन्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या मॉक ड्रिलमध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, विविध सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका सेवा तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. आपत्तीची सूचना मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत आपापल्या विभागांची तत्परता आणि सज्जता दाखवून दिली.

यावेळी नागरिकांना नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास घ्यावयाची खबरदारी, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, प्रशासनाशी समन्वय साधण्याची पद्धत तसेच बचावकार्या दरम्यान आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या रंगीत तालीमेमुळे आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता योग्य आणि संयमी पद्धतीने प्रतिसाद देण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यास या उपक्रमाची मदत झाली.

दरम्यान, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले व पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले.

Total Visitors :
4577064
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *