मंडणगड: पन्हाळी बुद्रुक येथील जाखमाता मंदिर आणि स्वयंभू शिवमंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते ५ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दोन्ही मंदिरांच्या उघड्या दरवाजामधून आत प्रवेश करत एकूण ६ घंटा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घंटा तांबे, पितळ आणि कांस्य या मिश्रधातूंमधून बनवलेल्या असून त्यांची एकूण किंमत अंदाजे २७,००० रुपये आहे.
चोरीस गेलेल्या घंटांमध्ये २० किलो वजनाची सुमारे १० हजार रुपये किमतीची १ घंटा, १० किलोची ६ हजार रुपये किमतीची जुनी घंटा, १२ किलो वजनाची सुमारे ६ हजार रुपये किमतीची पिवळसर रंगाची जुनी घंटा, प्रत्येकी २ हजार रुपये किमतीच्या ४ किलो वजनाच्या २ जुन्या घंटा आणि १ हजार रुपये किमतीची २ किलो वजनाची जुनी घंटा यांचा समावेश आहे. अज्ञात चोरट्याने ही चोरी तक्रारदार आणि पोलीस पाटील यांच्या संमतीशिवाय, स्वतःच्या फायद्यासाठी केली आहे.
या प्रकरणी पन्हाळी बुद्रुकचे रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण जाधव (वय ५२) यांनी तक्रार दाखल केली असून गुन्हा भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ नुसार गु.र.नं. ०९/२०२५ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. देव्हारे पोलीस पुढील तपास करत आहेत. मंदिरातून झालेल्या या चोरीमुळे गावकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी केली जात आहे.