संगमेश्वर आणि लांजात ओबीसी गट आरक्षण नसल्याने ‘गाव विकास समिती’चे अध्यक्ष उदय गोताड आक्रमक
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली गट आरक्षण सोडत रद्द करावी आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ओबीसी (OBC) समाजाला समान प्रतिनिधित्व मिळेल याची खात्री करावी, अशी जोरदार मागणी ‘गाव विकास समिती’चे अध्यक्ष उदय गोताड यांनी केली आहे. विशेषतः संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात एकही ओबीसी जिल्हा परिषद गट आरक्षण पडलेले नाही, जो या दोन्ही तालुक्यातील कुणबी – ओबीसी समाजावर मोठा अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, गोताड यांनी ही संपूर्ण सोडत प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या आरक्षण सोडतीमुळे संगमेश्वर आणि लांजा या दोन महत्त्वाच्या तालुक्यांतील कुणबी ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित राहावे लागत आहे.
“हा ओबीसी समाजावर अन्याय”
उदय गोताड यांच्या म्हणण्यानुसार, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात ओबीसी समाजाची मोठी संख्या असूनही आरक्षणाच्या सोडतीत त्यांच्या वाट्याला एकही गट आलेला नाही. हा स्पष्टपणे ओबीसी समाजावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची गट आरक्षण सोडत त्वरित रद्द करून नव्याने आणि न्याय्य पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करावी, जेणेकरून सर्व तालुक्यांतील कुणबी ओबीसी समाजाला समान पद्धतीने प्रतिनिधित्वाची संधी मिळेल, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
‘गाव विकास समिती’च्या या भूमिकेमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या गट आरक्षण सोडतीवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.