पाचल/ अंकुश पोटले: पाचल येथील जिजामाता विद्या मंदिर, रायपाटण या विद्यालयाला टाटा समूहाच्या टायटन कंपनी लिमिटेडने त्यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून चार संगणक देणगी स्वरूपात दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक गौतम पांगरीकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना सीएसआर विभागाचे प्रमुख दीपक शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की, एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयातून जितके विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवतील, तेवढे संगणक संच विद्यालयाला भेट दिले जातील. त्यांच्या या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठी नवी प्रेरणा निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
याप्रसंगी टायटन कंपनीचे अधिकारी प्रितेश खाके, अजित कदम, नागेश येऊणकर हे उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील कुंभार, सहाय्यक शिक्षक गौतम पांगरीकर, ज्येष्ठ शिक्षिका पल्लवी सावंत, नवरे मॅडम आणि माजी मुख्याध्यापक दामोदर लिंगायत यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
हे संगणक विद्यालयाला मिळण्यामागे विद्यालयाचे लिपिक संदीप कोलते यांचे विशेष प्रयत्न कारणीभूत ठरले. त्यांच्या या प्रयत्नांबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांना धन्यवाद देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी असे मत मांडले की, प्रत्येकाने अशा प्रकारे देणगी स्वरूपात प्रयत्न केल्यास विद्यालयाच्या सर्व शैक्षणिक गरजा पूर्ण होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधता येऊ शकते. सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत आणि देणगी द्यावी, यावर सर्वांच्या मताने सहमती दर्शवण्यात आली.